पुणे : पुणे महापालिकेच्या सन २०२६-२७ च्या वार्षिक अंदाजपत्रकाचे काम सुरू असून, त्यामध्ये पुणेकरांनाही सहभाग घेता येणार आहे. त्यासाठी महापालिकेने ‘माझे पुणे, माझे बजेट’ हा विशेष उपक्रम सुरू केला असून, त्यामध्ये जास्तीत जास्त पुणेकरांनी सहभाग घेत आपल्या परिसरातील आवश्यक विकासकामांच्या सूचना महापालिका प्रशासनाकडे नोंदविण्याचे आवाहन स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी केले आहे.
पुण्याच्या विकासात पुणेकरांचा थेट सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. शहराच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी नागरिकांच्या सूचना महत्त्वपूर्ण ठरतील, असा विश्वास श्रीनाथ भिमाले यांनी व्यक्त केला. ‘नागरिकांच्या सहभागातून शहराची प्रगती’ या संकल्पनेवर आधारित या उपक्रमात नागरिकांनी सहभाग घेऊन आपल्या परिसरातील रस्ते, पाणीपुरवठा, वाहतूक, उद्याने, सार्वजनिक सुविधा आदी संदर्भातील महत्त्वाच्या कामांची माहिती महापालिका प्रशासनाला देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुणे महापालिकेच्या अंदाजपत्रकाची तयारी सुरू असून, त्यामध्ये पुणेकरांच्या गरजा आणि प्राधान्यक्रमाचे प्रतिबिंब उमटण्यासाठी हा नागरिक सहभाग उपक्रम सुरू करण्यात आला आहे. नागरिकांनी आपल्या परिसरातील विकासकामांसाठी सूचना देऊन शहराच्या नियोजन प्रक्रियेत सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या उपक्रमांतर्गत नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने सूचना नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी दिलेला क्यूआर कोड स्कॅन करून नागरिकांना अर्ज भरता येणार असून, त्याद्वारे आपल्या परिसरातील आवश्यक कामांची माहिती थेट महानगरपालिकेकडे सादर करता येईल.
महानगरपालिकेच्या पीएमसी केअर या अधिकृत सिटिझन एंगेजमेंट प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये सजग नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन, शहराच्या विकासाला हातभार लावण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
‘माझे पुणे, माझे बजेट’ उपक्रमाला प्रतिसाद देण्याचे आवाहन
Date:

