पुणे-पुण्यात स्वस्त सोने देण्याच्या आमिषाने एका ज्येष्ठ महिलेची १ कोटी ३४ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणी एका दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.याबाबत ६१ वर्षीय ज्येष्ठ महिलेने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हेमंत दत्तात्रय खरोटे (वय ४५) आणि रुपाली हेमंत खरोटे (वय ३८, रा. शिवशंभोनगर, कात्रज-कोंढवा रस्ता) अशी गुन्हा दाखल झालेल्या दाम्पत्याची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला कात्रज भागातील एका सोसायटीत राहतात आणि त्यांची आरोपींशी ओळख होती. दोन वर्षांपूर्वी आरोपी दाम्पत्याने त्यांना स्वस्तात सोने मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यांनी महिलेला मोबाईलवरून सोन्याचे बिस्कीट आणि दागिन्यांची छायाचित्रे पाठवली.आरोपींनी महिलेला सांगितले की, सध्या सोन्याचा दर कमी आहे आणि येत्या काही दिवसांत तो वाढणार आहे. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून त्यांनी महिलेला आणि त्यांच्या पतीला गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले.
या आमिषाने महिलेकडून वेळोवेळी १ कोटी ४९ लाख ९५ हजार रुपये घेतले. आरोपींनी त्यांना केवळ ७ लाख २३ हजार रुपयांचे सोने आणि ७ लाख ९० हजार रुपये परत दिले. उर्वरित रक्कम किंवा स्वस्त सोने त्यांना मिळाले नाही.परतावा न मिळाल्याने ज्येष्ठ महिला आणि त्यांच्या पतीने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. आरोपी दाम्पत्याने १ कोटी ३४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलिस उपनिरीक्षक एस. भोसले या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

