जागतिक महिला दिनानिमित्त स्त्री आधार केंद्राचा परिसंवाद; मासिक पाळी रजेवर सखोल चर्चा
पुणे: जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला स्त्री आधार केंद्राच्या वतीने पुण्यात ‘महिलांचे आरोग्य अधिकार : मासिक पाळीत रजेची तरतुद’ या विषयावर परिसंवाद आणि कविता वाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधान परिषदेच्या उपसभापती व स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा डॉ. नीलम गोऱ्हे होत्या.
डॉ. गोऱ्हे यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा देताना सांगितले की, मासिक पाळी हा स्त्रियांच्या जीवनातील नैसर्गिक आणि महत्त्वाचा भाग आहे. सरकार या मुद्द्यावर सर्व बाजूंनी विचार करत आहे आणि लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. मात्र, रजेमुळे महिलांना विषम वागणूक किंवा भेदभाव मिळू नये याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. प्रत्येक स्त्रीचे दैनंदिन काम, आरोग्य आणि गरजा वेगवेगळ्या असतात. त्यामुळे रजा घ्यायची की नाही, हे पूर्णपणे तिच्या वैयक्तिक निर्णयावर अवलंबून असावे. “मासिक पाळी रजा” असे थेट नाव न देता त्याला अधिक संवेदनशील आणि समानतावादी नाव द्यावे, अशी सूचना त्यांनी केली.
स्त्रियांनी स्वतःच्या शरीराची काळजी घ्यावी आणि मासिक पाळीबाबतच्या सामाजिक धारणा बदलत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, राज्य सरकारने एकल महिलांच्या सर्वेक्षणासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली असून, हे काम सुरू झाले आहे. यामुळे एकल महिला अधिक सक्षम होतील. हे सर्व्हेक्षण करावे यासाठी मी उपसभापती या नात्याने माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे एकल महिलांचे सर्वेक्षण आणि धोरणाची मागणी दि.६मे २०२५ रोजी केली असल्याचे त्यांनी सांगितले.
‘बोलत्या व्हा आणि लिहित्या व्हा’ हा संकल्प महिला दिनानिमित्त करण्यात आला असून, महिलांनी मोठ्या संख्येने यात सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
कमिशन ऑन द स्टेटस ऑफ वुमन (CSW) ही लैंगिक समानता आणि महिला सक्षमीकरणासाठी समर्पित संयुक्त राष्ट्रसंघाची (UN) मुख्य जागतिक आंतरशासकीय संस्था आहे. याच्या CSW ७०वे सत्र नऊ मार्च पासून न्यूयॉर्क येथे सुरू होत आहे. त्याला समांतर असा ‘सर्वांसाठी न्याय मिळवणे आणि बळकट करणे’ या विषयावर कार्यक्रम उपसभापती कार्यालय व स्त्री आधार केंद्राच्यावतीने आयोजित करण्यात येणार आहे. त्यामध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाइन लिंक देण्यात येणार आहे. या लिंकसाठी स्त्री आधार केंद्राच्या कार्यालयात संपर्क करता येईल. असे त्यांनी सांगितले.
बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. मीनाक्षी नलबले-भोसले यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, मासिक पाळी ही पूर्णपणे नैसर्गिक प्रक्रिया आहे. सर्व महिलांना रजा देण्याची गरज नाही. फक्त ज्यांना अति त्रास होतो, त्यांनीच रजा घ्यावी. शाळांमध्ये स्वच्छता आणि मासिक पाळीबाबत मार्गदर्शन होत असून, कामाच्या ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे हे देखील महत्वाचे आहे.
स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त जेहलम जोशी यांनी मासिक पाळीत स्त्रियांच्या मनःस्थितीवर होणारा परिणाम आणि कामावर, घरगुती जबाबदाऱ्यांवर होणारा प्रभाव याबाबत बोलताना समाजात जनजागृती आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच, यादरम्यान महिलांना वेगळी वागणूक टाळावी, असे आवाहन केले.
कार्यक्रमात कवयित्री मृणाल पवार-गायकवाड यांनी भावपूर्ण कविता वाचन केले. सूत्रसंचालन अनिता शिंदे यांनी केले. आभार मीना इनामदार यांनी मानले. यावेळी स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त जेहलम जोशी, रश्मी जोशी, मृणाल गायकवाड, अपर्णा पाठक, शोभा कोठारी आदी उपस्थित होत्या.
हा परिसंवाद महिलांच्या आरोग्य अधिकार आणि मासिक पाळीशी संबंधित जागरूकता वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरला.

