मुंबईतील २० लाख झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करणार असून एमएमआरमध्ये १० लाख नवी घरे उभारली जाणार आहेत. तसेच नवीन झोपडपट्टी होणार नाही यासाठी ‘नो न्यू स्लम फ्रेमवर्क’ प्रणाली राबवली जाणार, अशी घोषणा या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
मुंबई, दिनांक ०६ मार्च २०२६
सन २०२६-२७ या वर्षाचा महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प आज ०६ मार्च २०२६ रोजी विधानसभेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला. या अर्थसंकल्पाचे बहुतांश तयारी ही स्व. अजित पवार यांनी केली होती. मात्र त्यांच्या अपघाती निधनानंतर देवेंद्र फडणवीस यांनी हा अर्थसंकल्प विधानसभेत मांडला.
अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्र्यांनी स्व. अजित पवार यांना आदरांजली वाहिली. यावेळी बोलताना, अजित दादांनी ११ वेळा अर्थसंकल्प मांडला. आज त्यांच्या जागी हा अर्थसंकल्प सादर करताना माझं अंतःकरण जड झालं आहे. लवकरच त्यांना श्रद्धांजली म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसं भव्य स्मारक उभारलं जाईल. तसेच गतिमान नागरी पुरस्कार त्यांच्या नावाने दिला जाईल. अशी घोषणा केली. तसेच, या वर्षाचा हा अर्थसंकल्प मी अजित पवार यांना समर्पित करतो. त्यांच्या करड्या स्वभावामुळे कायमच शिस्त पाळली गेली. कामाचा माणूस अशी त्यांची ओळख होती आणि त्यांच्या जाण्याने कधीही भरुन न निघणारी पोकळी तयार झाली आहे. असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेला हा अर्थसंकल्प २०४७ च्या विकासाकडे घेऊन जाणारा असून यात मुंबई शहरासाठी विशेष सोईसुविधांचा समावेश करण्यात आला आहे. तिसरी मुंबई म्हणून उरण परिसरात विकास केला जाणार आहे. तसेच मुंबईतील बेकायदेशीर बांधकामांवर बंदी आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. याशिवाय मुंबईतील, मेट्रो, रस्ते, विमानतळ, बुलेटट्रेन यासाठीही विशेष तरतुदींचा समावेश करण्यात आला आहे.
महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात मुंबईसाठी काय?
- मुंबईमध्ये वडाळा ते गेट वे ऑफ इंडिया या मार्गाची आणखी एक भुयारी मेट्रो प्रस्तावित
- मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ मेट्रो ८ : २२, ८६२ कोटी
- तळोजा ते खांदेश्वर नवी मुंबई मेट्रो २ : ५५७५ कोटी.
- दक्षिण मुंबई २०२८ पर्यंत समृद्धी महामार्गासह जोडली जाणार
- मुंबईमध्ये २०२९ पर्यंत १६५ कि.मी.च्या मेट्रोच्या मार्गिका तयार केल्या जाणार
- अटल सेतू थेट मुंबई विमानतळाला जोडणार
- मुंबईसह राज्यभरात १ हजार २०० किलोमीटरचे मेट्रो मार्ग उभारणार
- ६ हजार कि.मी. चे द्रुतगती मार्ग विकसित करणार
- वर्सोवा-भाईंदर सागरीकिनारा मार्ग डिसेंबर २०२८ पर्यंत पूर्ण करणार
- पनवेल ते कर्जत मार्ग अंतिम टप्प्यात, लवकरच वाहतुकीसाठी खुला केला जाणार
- मुंबई महानगर परिसरात सर्वांगिण आरोग्य आणि वेलनेसचे केंद्र उभारणार
- मुंबईतील रेडिओ क्लब येथील नवीन जेट्टीचे काम २०२७ पर्यंत पूर्ण करणार
- मुंबई ते वाढवण बंदर जोडण्यासाठी उत्तन ते विरार सागरी सेतू
- मरीन शिपयार्ड क्लस्टर विकसित करणार
- वडाळा, मुंबई येथे जागतिक दर्जाचे स्टार्टअप आणि इनोव्हेशन हब तयार करणार
- मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनची ठाणे ते तलासरी मार्गावरील तीन स्थानके फेब्रुवारी २०२७ पर्यंत पूर्ण होणार. विरार, बोईसर, ठाणे स्थानकाभोवती विकासाचा बृहद आराखडा तयार करणार
- मुंबईतील भुयारी मार्ग : ऑरेंज गेट, पूर्व मुक्तमार्ग ते मरीनड्राईव्ह, गोरेगाव-मुलुंड, ठाणे ते बोरीवली, खारघर ते तुर्भे, वांद्रे-वरळी सागरी सेतू ते हायस्पीड रेल्वेस्थानक वांद्रे-कुर्ला संकुल ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई
- मुंबई महानगरात गायमुख जंक्शन ते फाऊंटेन हॉटेल जंक्शन ते पुढे भाईंदर असा अनुक्रमे ६ आणि ९ कि.मी.चा भुयारी मार्ग
- उन्नत मार्ग : शिवडी-वरळी, ऐरोली-कटाई नका, ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, अटलसेतू ते मुंबई-पुणे द्रूतगती महामार्ग, छेडानगर ते आनंदनगर व आनंदनगर ते साकेत, ठाणे
याशिवाय राज्यात शहरी विकास ७० टक्के लोकसंख्या होणर आहे. त्यामुळे शहरी सेवा डिजिटल करण्यावर भर दिला जाणार आहे. मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन तीन स्थानकांचं काम २०२७ पर्यंत पूर्ण केलं होणार आहे. तिसरी मुंबई म्हणून येत्या काळात उरण परिसराचा विकास केला जाणार असून या तिसऱ्या मुंबईमध्ये कर्नाळा, साई, चिरनेर नवनगर आणि नवी मुंबई विमानतळ अधिसूचित क्षेत्र ही ग्रीन फिल्ड शहरे म्हणून विकासित केली जाणार आहेत. तसेच मुंबईमध्ये बेकायदेशीर बांधकामांवर आळा घालण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.
चौथी मुंबई वाढवण येथे विकसित केली जाणार आहे. लॉजिस्टीक्स आणि वेअर हाऊसिंगसाठी विकास केंद्र निर्माण करणार, वाढवण बंदरामुळे १२ लाखांहून अधिक रोजगार, मासेमारांसाठी सातपाटी येथे अत्याधुनिक मत्स्यबंदर, आसपासच्या ४४ गावात कौशल्य विकासाचे उपक्रम राबविणार.

