स्वानंद चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे यांच्या वतीने आयोजित, डेक्कन एज्युकेशन सोसायटी व स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई यांच्या सहकार्याने ‘मी सावरकर’ वक्तृत्व स्पर्धा
कमलेश रामचंद्र मराठे ठरले महाविजेते
पुणे : स्वतःच्या संकुचित स्वार्थाच्या राजकारणा पोटी ज्यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कष्टांचे आणि त्यागाचे काही घेणेदेणे नाही, तेच लोक खुनशीपणाने सावरकरांचा उल्लेख “माफीवीर” म्हणून करतात. जे त्यांना माफीवीर म्हणतात, त्यांना सावरकरांच्या त्यागाचा सन्मान करावासा वाटत नाही. माफीची तथाकथित पत्रे ही एक स्ट्रॅटेजी आहे. जर सावरकरांचा विरोध करायचा असेल, तर तो शालीनतेने करावा; त्यांच्या त्यागाचा सन्मान करावा, असे मत माजी आयएएस अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केले.
स्वानंद चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे यांच्या वतीने आयोजित, डेक्कन एज्युकेशन सोसायटी व स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई यांच्या सहकार्याने ‘मी सावरकर’ या अभिनव वक्तृत्व स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा फर्ग्युसन महाविद्यालय च्या अँफिथिएटरमध्ये संपन्न झाला. यावेळी महापौर मंजुषा नागपुरे, माजी आयएएस अधिकारी अविनाश धर्माधिकारी, संयोजन समिती अध्यक्ष धनंजय बर्वे, सी.ए. रणजीत नातू, प्रवीण गोखले, अमेय कुंटे, शैलेश काळकर, रवींद्र ढवळीकर, वर्षा ओक उपस्थित होते.
नाट्यवाचन स्पर्धेत दीपक दत्ता, प्रिया राजपूरकर-करे; वक्तृत्व स्पर्धेच्या वरिष्ठ गटात मेधा लोवलेकर; व्यावसायिक गटात संतोष कानडे; दुसरा आणि तिसरा गटात अनुक्रमे प्राजक्ता शेलवले, मोनिका; युवा गटात वैष्णवी परकाळे; ज्येष्ठ गटात कमलेश रामचंद्र मराठे; पहिला गटात आरुष घेरडे; संगीतमय गटात ऋचा महामुनी हे विजेते ठरले. कमलेश मराठे यांनी महाविजेतेपद पटकावले.
अविनाश धर्माधिकारी म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा स्पर्श ज्यांना होतो, त्यांचे जीवन उजळून निघायला सुरुवात होते. त्यांना माफीवीर म्हणणे म्हणजे निखालस खुनशीपणा आहे. यात जराही तथ्य नाही. भारताची थोरवी कशी वाढवायची हे आपल्या सगळ्यांसमोरचे महत्त्वाचे काम आहे. आपले कर्तृत्व भारतमातेसाठी अर्पण कसे करायचे हे ज्याला कळले, त्याला भारतमाता आणि सावरकर कळले, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
मंजुषा नागपुरे म्हणाल्या, ‘मी सावरकर’ स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा हा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा जागरण सोहळा आहे. सावरकर हे एक नाव नसून विचार आहे. ते केवळ कवी किंवा वक्ते नाहीत, तर क्रांतिकारक आणि शब्दाला कृतीची जोड देणारे महापुरुष आहेत. सावरकरांनी सांगितलेला विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन अंगीकारणे हीच त्यांना श्रद्धांजली आहे. आपल्या कृतीत सावरकरांची राष्ट्रनिष्ठा कायम राहू द्या, असेही त्यांनी सांगितले.
अशोक पलांडे म्हणाले, ‘मी सावरकर’ ही स्पर्धा नसून सावरकरांचे विचार पोहोचविण्याचे माध्यम आहे. समाजात वेगवेगळ्या विचारधारा निर्माण होत आहेत. सावरकरांचे विचार आत्मसात करावेत, हीच त्यांना श्रद्धांजली आहे. राष्ट्राचे संरक्षण करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, असेही त्यांनी सांगितले.
प्रवीण गोखले यांनी सूत्रसंचालन केले. रणजीत नातू यांनी प्रास्ताविक केले.

