माद्रिद:स्पेन आपल्या सैन्य तळांचा वापर इराणवर हल्ले करण्यासाठी होऊ देणार नाही. आम्ही अमेरिकेला परवानगी देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका स्पेनचे परराष्ट्र मंत्री जोसे मॅन्युएल अल्बारेस यांनी घेतली आहे. आम्ही अमेरिकेसोबत सैन्य तळ उभारले आहेत. दोन देश मिळून सैन्य तळ चालवतात. पण सैन्य तळ स्पेनच्या सार्वभौमत्वाखाली येतात. स्पेननं याआधीच इराणवरील हल्ल्यांचा निषेध केलेला आहे, याची आठवण करुन देत अल्बारेस यांनी करुन दिली. स्पेननं अमेरिकेला सैन्य तळ वापरु न देण्याची भूमिका घेत ताठ कणा दाखवल्याची चर्चा जगभरात सुरु आहे.
अमेरिका, इस्रायल आणि इराणचं युद्ध भडकलेलं आहे. त्याची झळ मध्य पूर्वेतील सगळ्या देशांना सहन करावी लागत आहे. इराणनं आखाती देशांमधील अमेरिकेच्या अनेक सैनिकी तळांना लक्ष्य केलं आहे. त्यामुळे आखाती देश सावध झाले आहेत. एकीकडे इराणनं अमेरिकेच्या तळांवर हल्ल्यांचा धडाका सुरुच ठेवलेला असताना स्पेननं डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाला दणका दिला आहे.
आमच्या सैन्य तळांचा वापर इराणवर हल्ला करण्यासाठी करु देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका स्पेननं घेतली आहे. स्पेनच्या मोरॉन आणि रोटामध्ये अमेरिकेसोबत स्पेनचे संयुक्त सैन्य तळ आहेत. स्पेननं कठोर भूमिका घेत थेट अमेरिकेला इशारा दिला आहे. त्यामुळे अमेरिकेला १५ लढाऊ विमानं स्पेनच्या तळांवरुन जर्मनी आणि फ्रान्सला न्यावी लागली. त्यामुळे ऐन युद्धात अमेरिकेला नामुष्की सहन करावी लागली.स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेज यांनी इराणवर अमेरिका आणि इस्रायलनं केलेल्या हल्ल्यांचा निषेध केला आहे. युरोपमध्ये येणाऱ्या स्पेननं अमेरिका आणि इस्रायल यांच्या कारवाईचा निषेध करत वेगळी भूमिका घेतली आहे. त्यामुळे स्पेनचे अमेरिकेसोबतचे संबंध अधिक ताणले जाण्याची शक्यता आहे.

