पुणे- इराण-इस्रायल युद्धस्थिती बाबत पुणे महापालिकेने गांभीर्याने काम करून युध्द होणाऱ्या देशांमध्ये अडकलेल्या पुणेकरांना माघारी पुण्यात सुखरूप आणण्यासाठी २४ तास कार्यरत असणारा स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचे काम तातडीने सुरु केले आहे.
इराण-इस्रायल युद्धस्थितीमध्ये अडकलेले पुणेकर नागरिकांच्या मदतीसाठी ‘विशेष मदत कक्ष’ व ‘डेटा बँक’ कार्यान्वित करण्याबाबत महापालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका यांस आदेश देण्यात आलेले आहेत. इराण आणि इस्रायलमध्ये सध्या उद्भवलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे पुणे शहरातील अनेक नागरिक, पर्यटक, विद्यार्थी आणि व्यावसायिक तिथे अडकल्याची दाट शक्यता आहे. युद्धभूमीवर अडकलेल्या या पुणेकरांच्या सुरक्षेबाबत त्यांच्या पुण्यातील नातेवाईकांमध्ये अत्यंत चिंतेचे वातावरण आहे. या गंभीर परिस्थितीचा आणि आपत्ती व्यवस्थापनाचा विचार करता, पुणे महानगरपालिकेच्या वतीने तातडीने खालील उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे.
१. २४x७ हेल्पलाईन कक्ष: पुणे महानगरपालिकेत एक स्वतंत्र कक्ष स्थापन करून २४ तास कार्यरत
असणारा हेल्पलाईन क्रमांक तातडीने जाहीर करावा.
२. पर्यटक आणि नागरिकांची डेटा बँक युद्धग्रस्त भागात अडकलेल्या पुणेकर पर्यटकांची आणि
रहिवाशांची अधिकृत यादी तयार करण्यात यावी.
३. नातेवाईकांकडून खालील माहिती संकलित करावी:
* अडकलेल्या व्यक्तीचे/पर्यटकाचे पूर्ण नाव.
* परदेशातील सध्याचा पत्ता/हॉटेलचा पत्ता.
* पासपोर्ट क्रमांक (Passport Number).
* तिथे उपलब्ध असलेला स्थानिक संपर्क क्रमांक.
समन्वय व कार्यवाही ही ‘डेटा बँक’ पुढील कार्यवाहीसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. सदर माहिती राज्य सरकार, केंद्र सरकार आणि परराष्ट्र मंत्रालयाला (MEA) तातडीने कळवावी, जेणेकरून तिथे अडकलेल्या पर्यटकांना आणि नागरिकांना सुरक्षितपणे मायदेशी आणण्यासाठी वेगवान हालचाली करता येतील.

