मुंबई,दि. २८ : महामार्गावरील वाहतूक अधिक सुरक्षित होण्याच्यादृष्टीने ज्वलनशील व तत्सम धोकादायक पदार्थांच्या वाहतूकीसंदर्भात आदर्श कार्यपद्धती एसओपी तयार करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ३ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रोपिलिन ज्वलनशील रसायन वायू वाहून नेणारा टॅंकर उलटल्याने झालेल्या वाहतूक कोंडीबाबतच्या लक्षवेधीला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. या चर्चेत सदस्य जयंत पाटील, आदित्य ठाकरे यांनी सहभाग घेतला.
आयटीएमएस प्रणाली कार्यरत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, भविष्यात पुन्हा कधी अशी दुर्घटना घडून नये यासाठी अशा पदार्थांची वाहतूक करणाऱ्या कंपन्यांना यासंदर्भात एसओपी तयार करण्याचे आदेश देण्यात आले असून या पद्धतीच्या आपात्कालीन परिस्थितीत सुरक्षित उपाय तातडीने करण्यासाठीची रेस्क्यु यंत्रणा, साधनसामुग्री आपल्याकडे उपलब्ध असणे आवश्यक आहे यादृष्टीने यंत्रणांना सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे केंद्र सरकारच्या संबंधित कंपन्यांनाही या प्रक्रियेत सहभागी करून, योग्य मार्गदर्शक सूचना ठरवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर बसवण्यात आलेली आयटीएमएस ही प्रणाली सध्या कार्यरत आहे. या प्रणालीचा उपयोग करून अशा प्रकारच्या अपघाताच्या प्रसंगी माहिती नागरिकांपर्यंत त्वरित पोहोचवता येईल आणि ट्रॅफिकचे व्यवस्थापन, नियंत्रण, तसेच डायव्हर्शन सुकर करता येईल. आयटीएमएस चा उपयोग करुन अशा घटनांमध्ये प्रवाशांना तातडीने याबाबतची सूचना देण्यासाठीची ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. जेणेकरुन प्रत्येक प्रवाशास अशा पद्धतीच्या परिस्थितीचा संदेश तत्काळ देता येईल, यासाठीची व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात येतील, असे मुख्यमंत्री यांनी सांगितले.
या वाहतूक कोंडीच्या कालावधीत ३६ तासात वसुल करण्यात आलेला टोल हा संबंधित मालकांना परत देण्याचा निर्णय झाला आहे. तसेच इतर प्रगत देशांमध्ये अशा आपातकालिन परिस्थितीत कोणत्या पद्धतीने तातडीने उपाययोजना राबवण्यात येते याची पडताळणी राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून करण्यात येत असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी दिली.
वाहतुकीचे नियोजन व प्रवाशांसाठी आपत्कालीन निर्गमन बाबतची कार्यप्रणाली
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतुक कोंडीची दखल घेऊन त्याबाबत अभ्यास करणे तसेच भविष्यात अशी परिस्थिती उद्भवल्यास तातडीच्या उपाययोजना तसेच अशा परिस्थितीतील वाहतुकीचे नियोजन व प्रवाशांसाठी आपत्कालीन निर्गमन बाबतची कार्यप्रणाली तयार करण्यासाठी भारतीय रस्ते महासभा (आयआरसी) चे माजी अध्यक्ष सी. पी. जोशी यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे.
मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर दि. ३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास मुंबईकडे जाणा-या मार्गावर आडोशी बोगद्याजवळ प्रोपिलिन गॅस वाहतूक करणारा कोची, केरळ येथून सुरत, गुजरात येथे जाण्याकरिता निघालेला टॅंकर पलटी होऊन त्यामधील ज्वलनशील वायूची गळती सुरु झाली होती. त्यामुळे, प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने द्रुतगती महामार्गावरील वाहतुक बंद करण्यात आली होती. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून घटनेबाबत प्रसारमाध्यमे, समाजमाध्यमातून माहिती प्रसारित करण्यात आली होती. तसेच हेल्पलाईन क्र. ९८३३४९८३३४ या महामार्ग पोलीस विभागाच्या प्रवाशांच्या मदतीकरीता असलेल्या क्रमांकावर प्राप्त कॉल्सवर घटनेची माहिती तसेच वाहतुकीच्या परिस्थितीची माहिती देण्यात येत होती. ठिकाणी महामार्ग पोलीस, रायगड जिल्हा पोलीस दल, फायर ब्रिगेड, एनडीआरएफ, एसडीएमए, बीपीसीएल, हेल्प फाऊंडेशन, काही केमिकल तज्ज्ञ, प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल हे घटना घडल्यापासून वायू गळती रोखून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशील होते.
अपघातग्रस्त टँकरमध्ये प्रोपिलीन गॅस असल्याने व हा गॅस अत्यंत ज्वलनशील असल्याने दि.०३ फेब्रुवारी २०२६ रोजी, सायंकाळी ०५.१० वाजता मुंबई बाजूकडे जाणारी वाहतूक अपघातस्थळापासून सुमारे १०० मीटर अलिकडे थांबविण्यात आली होती.
अपघाताच्या अनुषंगाने मुंबईकडे जाणारी वाहतूक पुणे मार्गावर एका मार्गिकेमधून वळविण्यात आली होती व पुणे वाहिनीच्या उर्वरित दोन मार्गिका पुण्याकडे जाणा-या वाहतुकीसाठी खुल्या ठेवण्यात आल्या होत्या. ही व्यवस्था दि. ०४ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ००.४४ वाजता दोन्ही वाहिनींच्या मध्य भागातील बॅरिअर हलवून करण्यात आली. तसेच मुंबईकडे जाणारी वाहतूक लोणावळा व खोपोली मार्गे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वर वळविण्यात आली होती.
केमिकल तज्ज्ञांच्या माध्यमातून ज्वलनशील गॅस गळती बंद करण्याचे अटीतटीचे प्रयत्न चालू होते व अपघातग्रस्त गॅस टँकरमधुन दुसऱ्या रिकाम्या टँकरमध्ये गॅस भरणे देखील चालु होते. अपघातग्रस्त गॅस टँकरमधील गॅस दुसऱ्या दोन रिकाम्या टँकरमध्ये भरुन दि. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ०१.०५ वा. अपघात ग्रस्त टँकरला दुसरी केबिन जोडण्यात आली. त्यानंतर टँकर सुरक्षित स्थळी हलविल्यानंतर रात्री ०१.४५ वाजता पुणे कॉरीडोरमधील तीनही लेनची वाहतूक चालू करण्यात आली. सदर गॅस टँकरमधील वायु गळती रोखणे हे तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक होते.
या विषयाबाबत संबंधित अधिकाऱ्यांची दि १० फेब्रुवारी २०२६ रोजी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीमध्ये टँकरचे वाहन नोंदणी तपशील सादर करण्यात आले, वाहन योग्यता प्रमाणपत्र व त्याची वैधता तपासण्यात आली, वाहन तपासणी करणारे अधिकारी व प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यांची माहिती घेण्यात आली, विमा, पीयुसी प्रमाणपत्र व त्यांची वैधता तपासण्याचे निर्देश देण्यात आले, काही कार्यालयांतून नियमबाह्य कालावधीसाठी जास्त वैधतेची फिटनेस प्रमाणपत्रे देण्यात आली असल्याचे निदर्शनास आले. बैठकीच्या अनुषंगाने टँकर अपघाताशी संबंधित सर्व बाबींची सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी असे निर्देश दिले आहेत,, अशी माहिती परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिली.

