पुणे -नगर रस्त्यावरील भावडी गावात गावठी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर गुन्हे शाखेने छापा टाकला. या कारवाईत एका महिलेला अटक करण्यात आली असून, पोलिसांनी ६ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव अनिशा योगेश गुडदावत (वय २०, रा. भावडी, ता. हवेली, नगर रस्ता) असे आहे. नगर रस्त्यावरील भावडी गावातील मोकळ्या जागेत एक महिला गावठी दारू तयार करून विकत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट सातला मिळाली होती. पोलीस कर्मचारी नितीन धाडगे आणि प्रतिक्षा पानसरे यांना ही माहिती मिळाली होती.
माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी गावठी दारू तयार करण्याच्या भट्टीवर छापा टाकला. या छाप्यात १८ लिटर तुरटी मिश्रित पाणी, गावठी दारू बनवण्यासाठी लागणारे रसायन आणि इतर साहित्य असा एकूण ६ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अनिशा गुडदावत हिच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली आहे. सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, सारंग दळे, गिरीष नाणेकर, निलेश साळवे, सुहास तांबेकर, प्रशांत कापुरे, निर्णय लांडे, नेहा तापकीर, सोनाली नरवडे, ऋषीकेश ताकवणे आणि बाळासाहेब तनपुरे यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली.

