पुणे- शहरातील बिबवेवाडी, आंबेगाव आणि मार्केट यार्ड परिसरात दहशत माजविणाऱ्या नऊ गुंडांना दोन वर्षांसाठी शहर आणि जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी दिले आहेत. एकाच वेळी नऊ जणांवर ही कारवाई करण्यात आल्याने गुन्हेगारांना जरब बसली आहे.
तडीपार करण्यात आलेल्यांमध्ये जालिंदर मसा मोरे (वय ४८, रा. अप्पर इंदिरानगर,पुणे), अण्णा ऊर्फ गणराज सुनिल ठाकर (वय २६, रा. अप्पर बिबवेवाडी), ओंकार लक्ष्मण सणस (वय २३, रा. बिबवेवाडी, पुणे), राजु महादेव डेंगळे (वय २२, रा. सुखसागर नगर,पुणे ), आकाश गुलाबराव कांबळे (वय २१), कृष्णा बबन लोखंडे (वय २४), आर्यन बापु बेलदरे (वय २४, रा. आंबेगाव बुद्रुक,पुणे), सोमगौडा गुरन्ना चौधरी (वय ३३, रा. मार्केटयार्ड,पुणे ) आणि साहिल भिमा अष्टगे (वय २०, रा. मार्केटयार्ड,पुणे ) यांचा समावेश आहे.
या आरोपींविरुद्ध खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, बेकायदा शस्त्र बाळगणे, गंभीर दुखापत करणे, धमकी देणे आणि मारहाण करणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे नागरिक भयभीत झाले होते, तसेच कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा निर्माण झाली होती.
शहरातील वाढती गुन्हेगारी आणि टोळीयुद्धाचा बिमोड करण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत. या गुंडांच्या वर्तनात प्रतिबंधात्मक कारवाई करूनही सुधारणा न झाल्याने आणि समाजात त्यांच्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने ही तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी ही कारवाई केली.

