6 व्या खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धांच्या समारोप समारंभात केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांचे प्रतिपादन
जम्मू आणि काश्मीर खेळांच्या माध्यमातून प्रगती आणि शक्यतांचा एक नवा अध्याय लिहित आहे
नवी दिल्ली, 26 फेब्रुवारी 2026
गुलमर्ग, जम्मू आणि काश्मीर, 26 फेब्रुवारी 2026: आगामी काळात गुलमर्गला एक प्रमुख जागतिक हिवाळी क्रीडा केंद्रात रूपांतरित करण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्धअसल्याचे युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी म्हटले आहे. जम्मू आणि काश्मीरमधील गुलमर्ग येथे झालेल्या सहाव्या खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्याच्या समारोप समारंभाला ते संबोधित करत होते.काश्मीरच्या भूमीत अफाट क्षमता आहे, आगामी काळात गुलमर्ग हे हिवाळी खेळांचे जागतिक केंद्र बनेल, असे केंद्रीय मंत्री म्हणाले.
गुलमर्गमधील आगामी हिवाळी क्रीडा स्पर्धांचा विस्तार केला जाईल आणि 15 दिवसांच्या एकात्मिक क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातील, तसेच खेळांना पर्यटन आणि सांस्कृतिक उपक्रमांची जोड दिली जाईल, अशी महत्वाची घोषणा त्यांनी यावेळी केली.
आता हिवाळी क्रीडा स्पर्धा चार दिवसांपुरत्या मर्यादित राहणार नाहीत. त्याला पर्यटनाची जोड दिली जाईल, आणि 15 दिवसांच्या हिवाळी क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातील, यात फिट इंडिया कार्निव्हल, सांस्कृतिक कार्यक्रम आणि अनेक स्पर्धांचा समावेश असेल, अशी माहिती त्यांनी दिली.
सहाव्या खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धांच्या दुसऱ्या टप्प्यात 25 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे 900 हून अधिक खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेने देशभरातली युवकांना एकत्र आणले.
खेळांमध्ये समाजाला एकत्र आणण्याची, खिलाडु वृत्ती जोपासण्याची, सुसंवाद वाढवण्याची आणि सर्वांगीण विकासाला चालना देण्याची परिवर्तनकारी शक्ती आहे, यावर डॉ. मांडवीय यांनी भर दिला.

जम्मू आणि काश्मीरमधील खेलो इंडिया सेंटर्समध्ये खेळाडू आणि प्रशिक्षकांशी झालेल्या संवादाचा उल्लेख करताना, त्यांनी या प्रदेशातून उदयाला येत असलेली उल्लेखनीय क्रीडा भावना आणि उत्कृष्टतेची वाढती संस्कृती, याची प्रशंसा केली.

हिवाळी क्रीडा पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षण प्रणाली अधिक मजबूत करण्यासाठी जम्मू आणि काश्मीरमध्ये राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र स्थापन केले जाईल, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.


