पुणे-दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाच्या तपासावर आमदार रोहित पवार यांनी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पुणे येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी आरोप केला की, या प्रकरणात व्हीएसआर (VSR) किंवा डीजीसीए (DGCA) यांना कोणीतरी वाचवण्याचा प्रयत्न करत आहे आणि यामागे मोठा दबाव आहे. अजित पवारांना न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.
पवारांनी दावा केला की, डीजीसीएवर टीडीपी (TDP) पक्षाचा दबाव आहे, कारण केंद्रीय विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू याच पक्षाचे आहेत. चंद्राबाबू नायडू यांचे संबंधित विमान कंपनीचे मालक रोहित सिंग यांच्याशी आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच, काही भाजप नेत्यांचेही व्हीएसआर कंपनीसोबत आर्थिक हितसंबंध असल्याचा दावा त्यांनी केला, ज्यामुळे तपासाची पारदर्शकता धोक्यात आल्याचे म्हटले.पुण्यातील सीआयडी (CID) कार्यालयात अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर आमदार पवार म्हणाले की, डीजीसीएने दिलेला अहवाल घेऊन त्यांनी मुंबईत एफआयआर (FIR) नोंदवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर बारामतीमध्येही एफआयआर नोंदवण्यासाठी गेले, परंतु त्यांची तक्रार नोंदवून घेण्यात आली नाही. तक्रार नोंदवण्याचा अधिकार असूनही ती घेतली जात नसल्याचे त्यांनी सांगितले.
अजित पवार यांच्या अपघाताबाबत एक अहवाल तयार करण्यात आला आहे. व्हीएसआर कंपनीने स्वतःची पाच विमाने खराब असल्याचे मान्य केले असून, त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे. लोकांच्या दबावामुळे २७ दिवसांनी सीआयडीने पत्रकार परिषद घेतली, परंतु तपास प्रगतीबाबत कोणतीही माहिती दिली नाही. डीजीसीएचा अहवाल २४ फेब्रुवारी रोजी आला असून, तो अद्याप सीआयडीकडे पोहोचला नसल्याचे सांगितले जात आहे.अजित पवारांना देण्यात आलेले विमान खराब होते, ते चांगले नव्हते. त्यामुळे त्यांना ते जाणीवपूर्वक दिले गेले का, असा प्रश्न निर्माण होतो, असे पवार म्हणाले. या प्रकरणी एफआयआर दाखल होऊ शकते, पण तक्रार घेतली जात नाही. त्यांनी स्वतः माहिती गोळा करून जबाब तयार केला असून, तो कलम १८० अंतर्गत नोंदवला आहे.
केंद्रीय विमान मंत्रालय विभागाचे मंत्री राममोहन नायडू यांच्या पक्षाला संबंधित व्हीएसआर विमान कंपनी आर्थिक मदत पुरवत असल्याने हा तपास निष्पक्ष कसा होणार, अशी शंका त्यांनी व्यक्त केली. हा एक गुन्हेगारी कट असून, घातपात करण्यामागे जे व्यक्ती आणि संस्था आहेत, त्यांचा सीआयडीने तपास करावा. विमान कंपनीविरोधात एफआयआर दाखल होत नसल्याने हा अपघात घातपात होता का, अशी शंका बळावत असल्याचेही त्यांनी नमूद केले. एएआयबी (AAIB) अहवालास उशीर झाला असून, तो अहवाल येईपर्यंत सर्वांना थांबावे लागणार आहे. त्यांच्याकडून चुकीचा अहवाल आल्यास हा घातपात होता हे शोधणे शक्य होणार नाही, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

विमान अपघात प्रकरणाशी संबंधित सर्व माहिती आणि पुरावे आज CID कडे सुपूर्द केले. अपघाताला जबाबदार VSR कंपनी तसेच DGCA विरोधात FIR दाखल करणे का गरजेचे आहे याबाबत चर्चा करून पारदर्शक आणि सखोल चौकशी करण्याची विंनती केली. आभाळाएवढी उंची असलेल्या नेत्याच्या अपघाताची साधी FIR सुद्धा घेतली जात नाही याची खंत वाटते. असो काहीही झाले तरी दोषींना मात्र सोडणार नाही, पूर्ण ताकदीनिशी हा लढा लढू!– रोहित पवार

