तपासाला कालमर्यादा नाही
पुणे-दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचा सीआयडी तपास योग्य दिशेने सुरू असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी दिली आहे. या अपघातात घातपात, निष्काळजीपणा किंवा कोणते गुन्हेगारी कृत्य घडले आहे का, याचा सखोल तपास करण्यात येत आहे आणि तसे निष्कर्ष निघाले तर तसा गुन्हा दाखल करू असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
रामानंद यांनी स्पष्ट केले की, बारामती वैद्यकीय महाविद्यालय, फॉरेन्सिक लॅब आणि केंद्रातील अनेक तपास संस्था या तपासात मदत करत आहेत. एअरक्राफ्ट इन्व्हेस्टिगेशन कमिटीचा (AAIG) तपासही सुरू असून, त्यांचे निष्कर्ष विचारात घेतले जात आहेत.तपासात घातपात, निष्काळजीपणा किंवा गुन्हेगारी कृत्य निष्पन्न झाल्यास, सीआयडी योग्य कलमाखाली गुन्हा दाखल करून पुढील तपास करेल आणि न्यायालयात अभियोग चालवण्याची तयारी ठेवली आहे. हा तपास गुन्हेगारी घटनांच्या अनुषंगाने केला जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
या घटनेचा तपास योग्य प्रकारे सुरू असून, केंद्रीय तपास यंत्रणा आणि विविध यंत्रणांची मदत घेतली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे, कोणत्याही तपासाला ठराविक मर्यादा नसते. या तपासात अनेक गुंतागुंतीच्या गोष्टी असल्या तरी, तो योग्य दिशेने सुरू आहे.गेल्या २८ दिवसांत अनेक पुरावे समोर आले असून, मोठ्या प्रमाणात पुरावे वेगाने गोळा करण्यात आले आहेत. उर्वरित पुरावे देखील लवकरच जमा करण्यात येतील, असे रामानंद यांनी सांगितले. सीआयडी नेमका कोणता तपास करत आहे आणि तपासाची गती काय आहे, यावरही लक्ष केंद्रित केले जात आहे, असे ते म्हणाले.

