बारामती-
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भीषण विमान अपघातात झालेल्या मृत्यूनंतर पवार कुटुंब आक्रमक झाले आहे. आमदार रोहित पवार यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, संबंधित कंपन्या आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली आहे. त्यांच्या भूमिकेला आता अजित पवार यांचे दुसरे पुतणे युगेंद्र पवार यांनीही जोरदार पाठिंबा दिला आहे. दोघेही मिळून व्हीएसआर कंपनीविरोधात थेट पोलिसांत तक्रार दाखल करण्याची मागणी करत आहेत. त्यासाठी दोघेही बारामती पोलिस ठाण्यात दाखल झाले असून अधिकृत एफआयआर नोंदवण्याची मागणी करत आहेत. तसेच पोलिस ठाण्याच्या बाहेरही मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमा झाले आहे.
अपघाताच्या दिवशी घडलेला घटनाक्रम सांगताना युगेंद्र पवार यांनी भावनिक शब्दांत अनुभव मांडला. मीच सर्वप्रथम घटनास्थळी पोहोचलो. बारामती विमानतळावर गेल्यावर सुरुवातीला काहीच दिसत नव्हते. त्यामुळे मी गाडी थेट रनवेवर नेली. 11 नंबर रनवेच्या टोकाला सुमारे 50 फूट खाली विमान कोसळलेले दिसले, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या मते, विमान पूर्णपणे जळून खाक झाले होते. संपूर्ण दृश्य धक्कादायक होते. दरम्यान, रोहित पवार यांनी याआधी मुंबईतील मरीन लाईन पोलिस ठाण्यात जाऊन एफआयआर दाखल करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तिथे तक्रार नोंदवली गेली नसल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे आता बारामतीत औपचारिक तक्रार देण्याचा निर्णय घेतला असून युगेंद्र पवारही त्यांच्यासोबत जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. व्हीएसआर कंपनी आणि संबंधित अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवण्याची त्यांची मागणी आहे.
जनहित याचिका उच्च न्यायालयात सादर
दरम्यान, या प्रकरणात न्यायालयीन पातळीवरही हालचाल सुरू झाली आहे. अजित पवार यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या विमान अपघाताबाबत सीआयडीकडून गुन्हा दाखल करण्याचे आदेश राज्य सरकारला द्यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात सादर करण्यात आली आहे. आरटीआय कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी ही याचिका दाखल केली आहे. 28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात शोककळा पसरली होती. मात्र अपघाताची कारणे आणि त्यामागील जबाबदारी निश्चित व्हावी, यासाठी स्वतंत्र चौकशीची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
याचिकेत काही गंभीर दावे करण्यात आले आहेत. अजित पवार मूळतः गाडीने बारामतीला जाणार होते. मात्र ऐनवेळी एका खासदाराचा फोन आला आणि त्यांना व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवास करण्यास प्रवृत्त करण्यात आले, असा दावा करण्यात आला आहे. तसेच ज्यांना मूळ कॅप्टन म्हणून नियुक्त करण्यात आले होते, ते दोघेही ट्रॅफिकमध्ये अडकले होते आणि त्यांचा जबाब अद्याप नोंदवण्यात आलेला नाही, असेही नमूद करण्यात आले आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे व्हीएसआर कंपनीवर युरोपमध्ये बंदी असल्याचा दावा याचिकेत आहे. भारतात या कंपनीची अधिकृत नोंदणी नसताना तिचे विमान कसे उडाले, याबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. या सर्व बाबींची चौकशी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या आयोगामार्फत व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
एकीकडे पवार कुटुंबीयांनी आक्रमक भूमिका घेत पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे, तर दुसरीकडे न्यायालयातही चौकशीसाठी दबाव वाढत आहे. अपघात नेमका कशामुळे झाला, यात कोणाची निष्काळजीपणा किंवा दुर्लक्ष होते का, याबाबत स्पष्टता येणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. व्हीएसआर कंपनीविरोधात कारवाईची मागणी, सीआयडी चौकशीचे निर्देश आणि स्वतंत्र आयोगाची स्थापना या सर्व मागण्यांमुळे हे प्रकरण आणखी गंभीर बनले आहे. आगामी काही दिवसांत पोलिसांची भूमिका, राज्य सरकारची भूमिका आणि न्यायालयीन सुनावणी याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. अजित पवार यांच्या मृत्यूमागील सत्य बाहेर येईल का, हा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांनाही पडू लागला आहे.

