बांधकामांच्या ठिकाणचे धुळीचे लोट रोखण्यासाठी मोहीम ही देवेंद्र फडणविसांची …
मुंबई- प्रदूषणामुळे कॅन्सर होत असल्याचे महाराष्ट्र सरकारने मान्य केले आहे. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी मंगळवारी विधानसभेत सांगितले की, आरोग्य विभागाने राबवलेल्या कॅन्सर स्क्रीनिंग मोहिमेत राज्यात १,६७७ रुग्ण आढळले. यामध्ये असे दिसून आले की, वायू प्रदूषण फुफ्फुसाच्या कॅन्सरच्या प्रकरणांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे.मात्र, केंद्र सरकारची भूमिका यापेक्षा वेगळी आहे. देशात अशी कोणतीही निर्णायक राष्ट्रीय आकडेवारी नाही, जी वायू प्रदूषण हे थेट मृत्यू किंवा कॅन्सरसारख्या आजाराचे एकमेव कारण असल्याचे सिद्ध करेल, असे सरकारने संसदेत स्पष्ट केले आहे.
फुफ्फुसाचा कॅन्सर हा एकूण कॅन्सर प्रकरणांच्या सुमारे ५७% आहे. तोंड, गर्भाशय आणि स्तनाचा कॅन्सर असलेले रुग्णही आढळले. दुसरीकडे, देशाची राजधानी दिल्लीतही कॅन्सर रजिस्ट्रीची आकडेवारी वेगाने वाढणाऱ्या प्रकरणांची साक्ष देत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबईतील वाढते वायू प्रदूषण, बांधकामांच्या ठिकाणचे धुळीचे लोट रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा आधार घेणार आहोत. मुंबईत बांधकामांवर देखरेख ठेवण्यासाठी इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित ‘डायनामिक मॉनिटरिंग’ व्यवस्था कार्यान्वित करण्याचे आदेश महापालिकेला देण्यात आले आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेची कॅन्सर संस्था आयएआरसीने बाहेरील वायू प्रदूषणाला ग्रुप-१ कार्सिनोजेन म्हणजेच कॅन्सर निर्माण करणारा सर्वात मुख्य घटक घोषित केले आहे. लॅन्सेट मेडिकल जर्नलच्या अहवालानुसार, पीएम २.५चे सूक्ष्म कण फुफ्फुसाच्या खोलीपर्यंत जाऊन पेशींच्या डीएनएचे नुकसान करतात. ज्यामुळे ट्यूमरचा धोका वाढतो. संशोधनानुसार धूम्रपान न करणाऱ्यांच्या फुफ्फुसाच्या कॅन्सरचे एक मोठे कारण दूषित हवेत असलेले सूक्ष्म विषारी कणच आढळले आहेत.
दिल्लीत ३ वर्षात १३% फुफ्फुस कर्करुण वाढले
दिल्लीत राष्ट्रीय कॅन्सर रजिस्ट्री प्रोग्रामनुसार २०२३ ते २०२५ दरम्यान महिलांत फुफ्फुसाच्या कॅन्सरच्या प्रकरणांमध्ये १३.६% ची वाढ झाली आहे. पुरुषांमध्ये फुफ्फुसाच्या कॅन्सरची प्रकरणे ८.८% वाढली आहेत. दिल्लीची वार्षिक पीएम २.५ पातळी डब्ल्यूएचओच्या मानकांपेक्षा २० पटीपर्यंत जास्त. एका दशकापासून दिल्ली जगातील सर्वात प्रदूषित राजधानींपैकी एक आहे. यामुळे श्वसन, हृदयविकाराचा स्पष्ट धोका आहे.
मुंबई : मानकापेक्षा ७ पट अधिक पीएम २.५
मुंबईत गेल्या दहा वर्षांपासून पीएम २.५/पीएम १० ची पातळी राष्ट्रीय मानकांपेक्षा सतत वर राहिली. गेल्या पाच वर्षांत पीएम १० ची सरासरी पातळी राष्ट्रीय मर्यादेपेक्षा जास्त राहिली आहे आणि पीएम २.५ ची पातळीदेखील डब्ल्यूएचओच्या मानकापेक्षा सुमारे सातपट जास्त आहे. म्हणजेच सुमारे एका दशकात मुंबईची हवा सतत प्रदूषित राहिली असून आरोग्याचा धोका कायम आहे.
केंद्राची भूमिका : प्रदूषण आणि आजारात थेट संबंध नाही…केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव राज्यसभेत म्हणालेे की, वायू प्रदूषण हेच मृत्यू किंवा कॅन्सरचे एकमेव प्रत्यक्ष कारण आहे, हे सिद्ध करणारा कोणताही अधिकृत डेटा भारतात उपलब्ध नाही.

