पुणे- येथील येरवडा मध्यवर्ती कारागृहात पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कारागृह प्रशासनाने शनिवारी केलेल्या विशेष झडती मोहिमेत विविध बराकींमधून ५ मोबाईल फोन, २ पॉवर बँक आणि चार्जिंग वायर असा प्रतिबंधित मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी कैदी नौशाद बदुद्दीन शेख आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही कारवाई कैदी नौशाद शेखच्या संशयास्पद हालचालींमुळे सुरू झाली. सहाय्यक तुरुंगाधिकारी सुनील गायकवाड कारागृह परिसरात गस्त घालत असताना, बाह्य शौचालयाच्या मागील बाजूस नौशाद शेख संशयास्पद स्थितीत दिसला. अधिकाऱ्यांनी त्याच्या दिशेने धाव घेतल्यावर, घाबरलेल्या नौशादने जमिनीवर पडलेला एक मोबाईल त्यांच्या स्वाधीन केला.यावेळी चौकशी केली असता, नौशादने उडवाउडवीची उत्तरे दिली. यामुळे संशय बळावला आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संपूर्ण परिसराची सखोल तपासणी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर कारागृह उपमहानिरीक्षकांच्या परवानगीने विशेष झडती मोहीम राबवण्यात आली.
या मोहिमेदरम्यान बराक क्रमांक १, २ आणि ६ ची कसून तपासणी करण्यात आली. बराक क्रमांक १ मध्ये कैदी नौशाद शेखच्या बॅगेत ‘हिरो’ कंपनीचा एक मोबाईल आणि चार्जिंग वायर सापडली.
बराक क्रमांक १ च्या बाहेरच्या परिसरात ‘नोकिया’ कंपनीचे बॅटरी व सिमकार्ड नसलेले तीन मोबाईल आढळले. तसेच, बराक क्रमांक ६ च्या बाहेरील भागात एक मोबाईल, दोन पॉवर बँक आणि चार्जिंग वायर लपवून ठेवल्याचे समोर आले.
कारागृहात मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू कशा पोहोचल्या, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. याप्रकरणी नौशाद शेख आणि इतर काही अज्ञात कैद्यांविरुद्ध कारागृह नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक कुंदन सत्रे करत आहेत. या रॅकेटमध्ये कारागृहातील इतर कोणाचे हात गुंतले आहेत का, याचा तपास सध्या सुरू आहे.

