मुंबई, दि. २५ फेब्रुवारी २०२६: राज्यातील ४५ लाख शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.० च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महावितरणचा नवी दिल्ली येथे बुधवारी (दि. २४) २०२६ च्या बिल्ड इंडिया इन्फ्रा अवॉर्डने गौरव करण्यात आला. केंद्रीय नवीन व नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्री. श्रीपाद नाईक यांच्याहस्ते मुख्य अभियंता श्री. ज्ञानेश कुलकर्णी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात तब्बल १६ हजार मेगावॅट विकेंद्रीत सौर ऊर्जा निर्मितीसाठी मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.० ची अंमलबजावणी सुरू आहे. राज्याच्या अपर मुख्य सचिव (ऊर्जा) श्रीमती आभा शुक्ला आणि महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनीही या योजनेला मोठी गती दिली आहे.
बिल्ड इंडिया इन्फ्रा अवॉर्डसाठी रस्ते, बंदरे, वीज, शहरी वाहतूक, पाणी आदी ८ क्षेत्रांतील पायाभूत सुविधा प्रकल्पांचे मूल्यमापन करण्यात येते. यंदा देशातील सुमारे १४५ प्रकल्पांचे मूल्यमापन करून निती आयोगाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अमिताभ कांत यांच्या अध्यक्षतेखालील २५ सदस्यांच्या निवड समितीने पुरस्कारांसाठी प्रकल्पांची निवड जाहीर केली. यात वीज क्षेत्रामध्ये मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.० च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महावितरणची देशपातळीवर पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
जगातील सर्वांत मोठा विक्रेंद्रीत सौर ऊर्जा प्रकल्प असलेल्या मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.० मध्ये आतापर्यंत १९८५ कृषीवाहिन्यांचे सौर ऊर्जीकरण करण्यात आले असून राज्यातील तब्बल १० लाख २५ हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीजपुरवठा उपलब्ध झाला आहे. या योजनेमुळे ६५ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह ७० हजारांवर ग्रामीण रोजगार निर्मिती सुरू आहे. तसेच महावितरणच्या वीज खरेदीमध्ये १० हजार कोटींच्या वार्षिक बचतीसोबतच क्रॉस सबसिडीमध्ये १३ हजार ५०० कोटींनी वार्षिक बोजा कमी होणार आहे. तब्बल २३१ विकासकांकडून या योजनेमध्ये १६ हजार मेगावॅटचे विकेंद्रित सौरऊर्जा प्रकल्प वेगाने उभारण्यात येत आहेत.
शेतकऱ्यांना प्रामुख्याने दिवसा व शाश्वत वीजपुरवठा करणे, वीज खरेदीचा व पर्यायाने अनुदानाचा बोजा कमी करणे, औद्योगिक व व्यावसायिक वीजदर कमी करणे यासाठी मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.० अत्यंत उपयुक्त ठरत आहे.

