मुंबई- विदर्भातील शेतकऱ्यांना कर्ज फेडण्यासाठी किडनी विकवी लागल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार विधानसभेत बोलताना आक्रमक झाले. जवळपास १९ शेतकऱ्यांना किडनी विकावी लागली असून, किडनी विकायला लावणाऱ्या सावकारांवर मकोका लावण्यात यावा, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. या रॅकेटचा सूत्रधार दिल्लीतील पद्मश्री मिळालेल्या डॉक्टरला महाराष्ट्र पोलिस अटक करणार का? असा सवालही वडेट्टीवार यांनी सभागृहात केला.
यावर राज्यमंत्री पंकज भोयर म्हणाले, विजय वडेट्टीवार यांनी दिलेली माहिती पूर्णपणे सत्य नाहीये. या प्रकरणात ९ लोकांच्या किडणी विकली. त्यामध्ये एकच शेतकरी आहे. एकूण ९ लोकांपैकी दोन लोक महाराष्ट्रातील आहेत, तर उर्वरित इतर राज्यातील आहेत. तसेच वडेट्टीवारांनी उल्लेख केलेला डॉक्टर हा संपूर्ण देशभरात किडनीची सर्जरी करतो. तो प्रसिद्ध डॉक्टर आहे. या प्रकरणात त्याचा सहभाग आढळल्यास त्यावर निश्चितपणे कारवाई करण्यात येईल. या प्रकरणात सरकार गंभीर आहे. सरकारने तातडीने सर्वांन अटक केलेली आहे. एसआयटी देखील लावली आहे. या प्रकरणातील सर्व लोकांवर कारवाई करण्यात येईल.

