मुंबई-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर आता या प्रकरणाला नवे वळण लागले आहे. “अजित दादांचा अपघात हा अपघात नसून घातपात आहे,” असा खळबळजनक दावा त्यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार यांनी केला असून, या तपासातील ‘व्हीसीआर’ (VSR) कंपनीच्या रेकॉर्डबाबत त्यांनी अत्यंत धक्कादायक माहिती समोर आणली आहे. विमानाच्या रेकॉर्डमध्ये मोठी बनवाबनवी सुरू असून यंत्रणांची एकमेकांशी मिलीभगत असल्याचा आरोप रोहित पवार यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे केला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गत २८ जानेवारी रोजी बारामतीजवळ विमान अपघातात निधन झाले होते. या दुर्घटनेत अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला होता. या अपघात प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी चौकशीची मागणी लावून धरली आहे. आता याच चौकशीच्या प्रक्रियेवर त्यांनी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
अजित दादांच्या अपघातातील विमानाच्या चौकशीच्या निमित्ताने रोहित सिंगला काल पायलट म्हणून चौकशीसाठी बोलवण्यात आल्याची माहिती मिळत असून काल रोहित सिंग देशात आला होता. तसेच VSR कडे विमानाच्या ५००० तासांपैकी केवळ १८०० ते २००० तासांचा रेकॉर्ड उपलब्ध असून उर्वरित ३००० तासांचे रेकॉर्डस उपलब्धच नसल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या मिसिंग रेकॉर्डची हेराफेरी, बनवाबनवी VSR ला करता यावी यासाठी चौकशी जाणूनबुजून लांबवली जात आहे का? असा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.
महाराष्ट्राचा लोकनेता गेला असताना अपघाताला जबाबदार कंपनीच्या मालकाला केवळ पायलट म्हणून चौकशीसाठी बोलावले जात असेल तर याचा अर्थ काय घ्यायचा ? दादांच्या अपघाताच्या गुन्हेगारी अँगलची चौकशी CID करत असताना VSR चा मालक भारतात आला असेल तर DGCA ने CID ला कळवणे आवश्यक का समजले नाही? अशी विचारणाही रोहित पवार यांनी केली.
DGCA आणि VSR ची मिलीभगत, यंत्रणांचा एकमेकांशी असलेला विसंवाद बघता, अजित दादांची यांच्या लेखी किती किंमत आहे हे कळून चुकले ….केंद्र आणि राज्य सरकार थोडे गांभीर्य दाखवेल, अशी अपेक्षाही रोहित पवार यांनी व्यक्त केली.
यापूर्वीही रोहित पवार यांनी पत्रकार परिषदा घेऊन ब्लॅक बॉक्सची माहिती, अपघातग्रस्त विमानाच्या कंपनीच्या मालकाची माहिती, त्यांना असलेले कथित राजकीय वरदहस्त याबाबत त्यांनी सातत्याने चर्चा केली आहे. त्यांच्या मते या विमानाची एकूण क्षमता ५ हजार तास उडण्याची होती. जेव्हा अजित पवारांना हे विमान देण्यात आले, तेव्हा त्याची क्षमता संपत आली होती. केवळ १०-१५ तास शिल्लक होते. त्यामुळे असे विमान अजित पवारांना दिलेच नव्हते पाहिजे. तसेच हे विमान ८ हजार तासांहून अधिक काळ उडवले गेल्याची शक्यता असल्याचे रोहित पवारांनी वर्तवली होती. त्यातच, आता त्याचा रेकॉर्डच उपलब्ध नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.

