पुणे, दि.२४: जल जीवन मोहिमे अंतर्गत पाणीपुरवठा योजनांची भौतिक पूर्णता पूर्ण करून मंजूर पाणीपुरवठा योजनांची कामे विहित कालावधीत पूर्ण करून भौतिकदृष्ट्या कार्यान्वित करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी निर्देश दिले.
जल जीवन मोहिमेची प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनची बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषददेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांच्यासह महाराष्ट्र जीवन प्राधिकरण भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा आदी अधिकारी उपस्थित होते.
श्री. डुडी म्हणाले, हर घर नल योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थी कुटुंबाला नळाद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करण्यावर भर देण्यात आला. प्रलंबित एफएचटीसी असलेल्या योजनांना प्राधान्य देण्यात यावे.ज्या योजनांमध्ये नळ जोडणी अद्याप प्रलंबित आहेत, त्या योजना तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
योजनांची अंमलबजावणी करतांना उद्भवणारे जमीन विषयक प्रश्न,पाणीपुरवठा योजना राबविताना येणाऱ्या भू-संपादन व परवानगीसंबंधी अडचणी तात्काळ समन्वयाने सोडवून कार्यवाही करावी. याबाबत सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वय राखून जल जीवन मोहिमेची उद्दिष्टे वेळेत पूर्ण करण्याबाबत ठोस कार्यवाही करण्याचे जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी निर्देश दिले.

