मालेगाव -भाजपचे आक्रमक नेते किरीट सोमय्या यांच्या मालेगाव दौऱ्याने आज शहरात मोठी खळबळ उडवून दिली. “मालेगाव हे आता बांगलादेशी घुसखोरांचा अड्डा आणि अतिरेक्यांचे केंद्र बनले आहे,” असा घणाघाती आरोप करत सोमय्या यांनी स्थानिक प्रशासकीय यंत्रणेच्या कारवाईचा पाढाच वाचला. दरम्यान, या दौऱ्यात किरीट सोमय्यांच्या सुरक्षा रक्षकांनी पत्रकारांना केलेल्या धक्काबुक्कीमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी बांगलादेशी व रोहिंग्या मुस्लिमांना बनावट जन्मदाखले जारी करण्यावरून राज्यभर रान पेटवले आहे. याच निमित्ताने ते आज मालेगाव दौऱ्यावर आले होते. किरीट सोमय्या मालेगावात दाखल होताच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना प्रश्नांची विचारणा करण्यासाठी घेरले. यावेळी प्रचंड गर्दी झाल्याने सोमय्यांच्या बॉडीगार्ड्सनी पत्रकारांना अक्षरशः ढकलण्यास सुरुवात केली. यावेळी सुरक्षा रक्षकांनी अरेरावीची भाषा वापरत धक्काबुक्की केल्याने पत्रकार आणि गार्ड्समध्ये तीव्र बाचाबाची झाली. या प्रकारामुळे उपस्थित पत्रकारांनी तीव्र संताप व्यक्त केला असून सोमय्यांच्या या दौऱ्याला गालबोट लागले.
घुसखोरांच्या मुद्द्यावर बोलताना सोमय्या यांनी आकडेवारीसह माहिती दिली. ते म्हणाले, “पोलिस, मनपा, जिल्हाधिकारी यांच्याशी माझी चर्चा झाली. एकूण चार विषयावर चर्चा झाली. SIR, मतदार साफसफाई मोहीम, जी नावं दिली आहेत ती नावे ताबडतोब मतदार यादीतून काढणे, जे दाखले रद्द केले ते नवे काढले यावर चर्चा झाली.
बोगस जन्म दाखले दिल्याप्रकरणी मालेगावात आतापर्यंत ४२ एफआयआर (FIR) दाखल झाले असून १०८३ जणांवर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. सुमारे ४४०० अवैध दाखले रद्द करण्यात आले असून आणखी २००० पुराव्यांची चौकशी सध्या सुरू आहे.” घुसखोरांना मदत करणाऱ्या ४० हून अधिक अधिकाऱ्यांवरही कारवाईची कुऱ्हाड कोसळल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. कारवाई संदर्भात मुख्यमंत्री वेळ देतील, असेही त्यांनी सांगितले.
“बोगस बांगलादेशी आणि बनावट जन्म दाखल्यांच्या रॅकेटला पायबंद घालण्यासाठी केंद्र सरकार पुढच्या संसदेच्या अधिवेशनात विशेष विधेयक सादर करणार आहे,” अशी महत्त्वाची माहिती सोमय्या यांनी दिली. “ज्यांचे दाखले रद्द झाले आहेत पण त्यांच्याकडे भारतात जन्मल्याचा ठोस पुरावा आहे, त्यांनीच पुन्हा अर्ज करावा,” असेही किरीट सोमय्या यांनी स्पष्ट केले.
सोमय्या यांनी आज पोलिस, महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा केली. बोगस दाखल्यांच्या आधारे मतदार यादीत घुसलेल्यांची नावे तात्काळ वगळण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मालेगावात सर्वाधिक बोगस अर्ज आले असून प्रशासकीय अधिकारी त्यांचे पितळ उघडे पाडत आहेत, ही कौतुकास्पद बाब आहे,” असेही ते म्हणाले. मालेगाव अतिरेक्यांचे केंद्र झालेले आहे. बोगस बांगलादेशींचा अड्डा झाले आहे, असा आरोपही सोमय्या यांनी केला.
दरम्यान, मालेगावच्या महापौर नसरीन बानो खालिद शेख यांनी आयुक्त रवींद्र जाधव यांना महापौर व महासभेच्या परवानगीशिवाय कोणतेही कागदपत्रे भाजप नेते किरीट सोमय्या यांना देवू नयेत अशा लेखी सूचना दिल्या आहेत. चौकशीत एकही रोहिंग्या किंवा बांगलादेशी आढळला नाही. त्यामुळे सोमय्या मालेगावला बदनाम करीत असून, अल्पसंख्याकांना लक्ष करीत असल्याचे मायनॉरिटी डिफेन्स कमिटीने म्हटले आहे. पहिल्याच महासभेत जन्मदाखल्यांचा विषय चर्चेत आला. महासभेने विशेष कमिटी स्थापन केली आहे. सोमय्या यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महापौर नसरीन बानो यांनी आक्रमक पवित्रा घेत आयुक्तांना पत्र दिले.

