मराठी भाषा गौरव दिनानिमित्त खास स्ट्रीम फेस्ट अल्ट्रा झकास मराठी ओटीटी वर
मुंबई,: येत्या २७ फेब्रुवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म अल्ट्रा झकास मराठी ओटीटीने खास ‘मराठी भाषा गौरव दिन स्ट्रीम फेस्ट’ सादर करण्याची घोषणा केली आहे. मराठी भाषा, साहित्य, रंगभूमी आणि चित्रपटांचा समृद्ध वारसा डिजिटल माध्यमातून अनुभवण्याची ही एक खास संधी आहे.
फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात रंगणाऱ्या या विशेष सोहळ्यात १९९० नंतरच्या दशकांतील गाजलेले आणि पिढ्यानपिढ्या लक्षात राहिलेले चित्रपट पुन्हा एकदा पाहता येणार आहेत. अल्ट्रा झकासच्या ४,०००+ तासांच्या लायब्ररीतून १,५०० पेक्षा अधिक चित्रपट आणि वेब सिरीज प्रेक्षकांसाठी उपलब्ध असतील. यात क्लासिक चित्रपट, गाजलेली नाटके, पुरस्कारप्राप्त ओरिजिनल वेब सिरीज, गाजलेल्या मालिका, बालकार्यक्रम आणि संस्कृतीशी नाते सांगणाऱ्या कथा यांचा समावेश असणार आहे.
‘मराठी भाषा गौरव दिन’ हा ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. मराठी साहित्य आणि भाषेच्या समृद्ध परंपरेचा गौरव करण्याचा हा दिवस अल्ट्रा झकासच्या मराठी आशय जतन आणि डिजिटायझेशनच्या ध्येयाशी पूर्णतः सुसंगत ठरतो.
या ‘स्ट्रीम फेस्ट’मध्ये २५ निवडक चित्रपटांचा खास समावेश करण्यात आला असून विनोदी, कौटुंबिक, सामाजिक, थ्रिलर आणि भावनिक अशा विविध चित्रपटसृष्टीची ताकद प्रेक्षकांना अनुभवता येईल. या संग्रहातील काही चित्रपटांमध्ये मानसशास्त्रीय थरारपट काल रात्री १२ वाजता (१९९९) याचा समावेश आहे. अलका कुबल अभिनीत हा चित्रपट मराठीतील सुरुवातीच्या थरारपटांपैकी एक मानला जातो. आजोबा (२०१४) मध्ये उर्मिला मातोंडकर यांनी साकारलेली भूमिका आंतरपिढीतील नात्यांची हळवी गोष्ट सांगते. सोनाली कुलकर्णी अभिनीत कच्चा लिंबू (२०१७) हा चित्रपट तरुणांच्या भावविश्वावर आधारित संवेदनशील कथा मांडतो, तर किशोरी शहाणे अभिनीत खैरलांजीच्या माथ्यावर (२०१४) समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांकडे लक्ष वेधतो. याशिवाय स्वर्गीय प्रिया मराठे आणि अलका कुबल यांचा विघ्नहर्ता महागणपती (२०१५), अतुल कुलकर्णी यांचा सुखांत (२०१०), उषा नाडकर्णी आणि विजय चव्हाण यांचा व्हॉट अॅन आयडिया मॅडम (२०११), आशुतोष राणा यांचा येडा (२०१३) तसेच दिलीप प्रभावळकर यांचा गोळा बेरीज (२०१२) हे चित्रपटही या फेस्टमध्ये पाहायला मिळणार आहेत.
मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने खास दिग्दर्शक अनंत महादेवन यांचा आणि दिलीप प्रभावळकर व रोहिणी हट्टंगडी अभिनीत ‘आता वेळ झाली’ या चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर आयोजित करण्यात आला आहे. तसेच प्रसाद ओक दिग्दर्शित आणि अभिनीत ‘वडा पाव’ ही २०२५ मधील हृदयस्पर्शी रोमँटिक कॉमेडीही या फेस्टचा भाग असणार आहे.
रंगभूमीचा वारसा जपण्यासाठी ‘रंगभूमी स्पॉटलाइट’ या विशेष विभागातून गाजलेली मराठी नाटकेही सादर केली जाणार आहेत. मच्छिंद्र कांबळी, विजय चव्हाण आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांसारख्या दिग्गज कलाकारांच्या नाटकांचा यात समावेश आहे. ‘श्रीमंत दामोदर पंत’, ‘यदा कदाचित १ आणि २’ तसेच ‘जाऊबाई जोरात’ ही लोकप्रिय नाटके प्रेक्षकांना पाहता येतील.
या स्ट्रीम फेस्टमध्ये ‘सौभाग्यवती सरपंच’, ‘आयपीसी’, ‘बेटर हाफ ची लव्ह स्टोरी’, ‘जिलबी’, ‘राख’ आणि ‘खोताची वाडी’ या लोकप्रिय अल्ट्रा झकास ओरिजिनल्सनाही विशेष स्थान दिले जाणार आहे. या सगळ्या कलाकृतींमध्ये आपल्या परंपरेचा वारसा आणि आजच्या काळातील कथा सांगण्याची नवी शैली यांचा छान संगम दिसतो. त्यामुळे प्रेक्षकांना जुनी ओळख आणि नवीन अनुभव दोन्ही एकाच ठिकाणी पाहायला मिळतील.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त होणाऱ्या ‘या’ फेस्टबद्दल बोलताना, अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लि. चे सी.ई.ओ. श्री. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले, “मराठी भाषा ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. हा ‘मराठी भाषा गौरव दिन स्ट्रीम फेस्ट’ फक्त चित्रपट दाखवण्यापुरता नाही, तर मराठीपणाचा अभिमान साजरा करण्यासाठी आहे. जुन्या गाजलेल्या कलाकृतींपासून ते नव्या कथांपर्यंत मराठीची समृद्ध परंपरा जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे प्रथम उद्दिष्ट आहे.”
मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि मराठी सिनेमा यांचा खास संगम अनुभवण्यासाठी या २७ फेब्रुवारीला ‘मराठी भाषा गौरव दिन स्ट्रीम फेस्ट’ जरूर अनुभवा, फक्त अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर.
शिवाय अल्ट्रा झकास प्लॅटफॉर्म Android, iOS, टॅब, वेब, Android TV, Fire TV, Jio Store आणि Cloud TV वर सहज उपलब्ध आहे. त्यामुळे प्रेक्षकांना याचा आनंद कधीही, कुठेही घेता येईल.

