प्रदूषण रोखण्यासाठी जिल्हाधिकारी , महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची संयुक्त बैठक लावण्याची मागणी
पुणे- एकीकडे शरद पवार या आपल्या राजकीय पितामहांशी फारकत घेऊन, त्यांचा पक्ष आणि समर्थक या दोहोंवर कबजा मिळवून पवार साहेबांच्या मनाविरुद्ध भाजप समवेत जाणाऱ्या अजित पवारांचे आणि पवारांची कन्या सुप्रिया यांच्यातील बहीण भावाच्या नात्याचा गोडवा अनेकांना ठाऊक आहे , कित्येक वेळा माध्यमांनी त्याला ठळक प्रसिद्धीही दिली आहे. मात्र पवार साहेबांबद्दल बोलाल तर खबरदार .. अशी तंबीही वेळप्रसंगी याच कन्येने दिलेली आहे. एकीकडे प्रियाचा आशीर्वाद , पित्याचं प्रेम आणि दुसरीकडे भावाचे सत्तेसाठी महत्वाकांक्षी राजकारण यात सुप्रिया सुळे पित्याच्या पाठीशी ठाम उभ्या राहिल्या अनेकांनी आपल्या पित्याशी केलेली प्रतारणा (‘गद्दारी’)त्यांना मानवलेली नाही. मात्र यापूर्वीच्या काळात त्यांच्याशी असलेले स्नेहसंबंध देखील त्या विसरू शकलेल्या नाहीत . अशा अवस्थेत आता संपूर्ण पक्षाचा गाडा त्यांच्या खांद्यावर आहे. तो वाहताना त्यांना याच आपल्या नातलग अथवा जुन्या , सहकारी , आदरणीय अशा नेत्यांच्या विरोधातही प्रसंगी उभे ठाकावे लागणार आहे .. या पार्श्वभूमीचा विचार केला तर त्यांनी कालचे केलेले ट्वीट अजितदादांना टोला मानले तर गैर समजण्याचे कारण नाही अर्थात सुळे यांनी जरी ते लोकहितासाठी केले असले तरी त्याला राजकीय रंगही काहींनी दिला तर तो नाकारताही येणारा नाही . काय केले आहे सुप्रिया सुळे यांनी ट्वीट ते पहा ….
खडकवासला धरणातून पुणे शहर आणि परिसराला पाणीपुरवठा करण्यात येतो. परंतु येथे साठणाऱ्या कचऱ्यामुळे परिसरातील जलस्रोत प्रदूषित होत आहेत. त्याचा परिणाम धरणातील पाण्यावरही होत आहे. याशिवाय परिसरात डासांची पैदास होत असून हिवताप, मलेरिया यांसारखे आजारही पसरत आहेत. यावर उपाययोजना करण्यासाठी आणि प्रदूषण रोखण्यासाठी जिल्हाधिकारी पुणे, महापालिका पुणे आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची एक संयुक्त बैठक लावणे आवश्यक आहे. तरी पालकमंत्री पुणे यांनी याबाबत वैयक्तिक लक्ष घालून ही बैठक लावावी ही विनंती.
अर्थात आता पालकमंत्री अजितदादा आहेत. आणि दादांचा आणि धरणातील पाण्याचा वारंवार संबध आलेला आहे . त्यांचा पुण्याच्या पाण्याचा प्रश्न , स्थिती यावर चांगला अभ्यास आहे . पण असे असतानाही त्यांना त्यांच्याच बहिणीला अशी विनंती करण्याची वेळ आली हे विशेषच मानावे लागणार आहे . आता अजितदादा यावर किती लक्ष देतात ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

