पुणे, दि. २४ : भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक बांधणीत मोलाचे योगदान देणारे, पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू असलेले राजेश पांडे यांची पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) बी. एल. संतोष यांच्या उपस्थितीत पक्षाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी याबद्दल अधिकृत घोषणा केली. राजेश पांडे यांना चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष असतांना लोकसभा निवडणुकी दरम्यान सरचिटणीस म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. आता भाजपचे नवे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सरचिटणीस टीममध्येही राजेश पांडे यांची वर्णी लागली आहे.
राजेश पांडे यांच्यासह निरंजन डावखरे , योगेश सागर , संजय कुटे , माधवी नाई आणि सुनील राणे हे सरचिटणीस म्हणून रवींद्र चव्हाण यांच्यासोबत काम करतील.
भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस असलेले राजेश पांडे ४० वर्षांहून अधिक काळ सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असून अभ्यासू, मितभाषी, उत्तम संघटक आणि नावीन्यपूर्ण लोकसहभाग उपक्रम राबविणारे अशी पांडे यांची ओळख आहे. यानिमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांच्या मुशीत वाढलेला, विद्यार्थी चळवळीत तयार झालेला कुशल संघटक आणि निष्ठावान चेहऱ्याला पक्षाने संधी दिली अशी भावना भाजपच्या कार्यकर्त्यांमधून उमटत आहे.
राजेश पांडे यांच्या सामाजिक कामाची सुरुवात अभाविप मधून झाली. गेल्या चाळीस वर्षांहून अधिक काळ ते सामाजिक राजकीय जीवनात सक्रिय असून भाजपच्या पक्ष रचनेत उत्कृष्ट संघटन कौशल्य, पक्ष योजनांमध्ये युवक आणि लोकसहभागांचे ‘गिनीज विक्रम’ आणि पुणे पुस्तक महोत्सवाच्या व्यापक यशामुळे राजेश पांडे यांचे नाव संपूर्ण महाराष्ट्रासह राष्ट्रीय पातळीवर देखील ओळखले जाते. मूळचे खान्देशी असलेले पांडे यांनी उत्तर महाराष्ट्रानंतर पश्चिम महाराष्ट्रातही पक्षाची आणि विचार परिवाराची पाळेमुळे घट्ट रोवण्यात, विविध समाजघटकांना पक्षाशी जोडण्यात आणि तळागाळातील कार्यकर्त्यांना बळ देण्यात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
महाराष्ट्रातील तीन प्रमुख विद्यापीठांच्या व्यवस्थापन परिषदांवर सदस्य म्हणून त्यांनी काम केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात त्यांच्या पुढाकाराने राबवलेले उपक्रम गिनीज विश्व विक्रम म्हणून नोंदवले गेले आहेत. त्यात युवा सहभाग आणि लोक प्रबोधन केंद्रस्थानी राहिले. शिक्षण, आरोग्य, रोजगार, क्रीडा, सहकार आणि सांस्कृतिक वारसा संवर्धन या क्षेत्रांत त्यांनी शहरी आणि ग्रामीण भागात विविध उपक्रम राबवले आहेत.
संघटनात्मक पातळीवर काम करत असतानाच सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला आहे. त्यांच्याच पुढाकाराने आणि नेतृत्वाखाली पुण्यात गेल्या तीन वर्षांपासून आयोजित करण्यात येत असलेल्या ‘पुणे पुस्तक महोत्सवाने’ जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण केली आहे. वाचन संस्कृती रुजवण्यासाठी अत्यंत भव्य प्रमाणात आयोजित केलेल्या या महोत्सवाने १५ हुन अधिक विश्वविक्रम नोंदवून एक अभूतपूर्व ऐतिहासिक यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे हे सर्व करत असतांना पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक नियोजनाचीही जबाबदारी त्यांनी लीलया पार पाडली. त्यांच्या याच कार्याची आणि पक्षनिष्ठेची दखल घेत पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांनी त्यांच्यावर पुन्हा एकदा ही मोठी जबाबदारी सोपवल्याचे बोलले जात आहे.
राजेश पांडे यांच्यासारख्या अभ्यासू, अनुभवी आणि उत्तम संघटन कौशल्य असलेल्या नेत्याची सरचिटणीस पदी झालेली नियुक्ती पश्चिम महाराष्ट्रात आणि पर्यायाने संपूर्ण राज्यात कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा देणारी ठरेल, असा विश्वास भाजपा कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.
“मी गेली ४० वर्ष सामाजिक जीवनात सक्रिय आहे. माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून पक्षाने पुन्हा एकदा सरचिटणीस पदाची मोठी जबाबदारी सोपवली, याबद्दल मी पक्षाचे केंद्रीय नेतृत्व, प्रदेशाध्यक्ष मा. रविंद्रजी चव्हण आणि विशेषतः राज्याचे विकासपुरुष मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांचा मनःपूर्वक आभारी आहे. पक्षाची संघटनात्मक बांधणी असो वा कोणतेही सांस्कृतिक कार्य असो पक्षाने आणि वरिष्ठांनी नेहमीच मला काम करण्याचे स्वातंत्र्य दिले आणि पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे. यावेळी मा. चंद्रकांतदादा पाटील, मा. चंद्रशेखरजी बावनकुळे यांचेही मोलाचे मार्गदर्शन वेळोवेळी मिळत असते. आगामी काळात देखील पक्षाचा विचार तळागाळातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि संघटना अधिक भक्कम करण्यासाठी नव्या ऊर्जेने आणि निष्ठेने मा. चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत राहील.” – राजेश पांडे, सरचिटणीस, भाजपा

