मुंबई : अजित पवारांच्या शोकप्रस्तावावर बोलताना आमदार रोहित पवार यांना आज विधानसभेत अश्रू अनावर झाले. अजितदादा पवार नावाचा जादूगार संबंध महाराष्ट्राला हसवत हसवत गेला. दादांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणातील मिश्कीलपणा गेला. ते नेहमीच मला माझ्या शर्टचे वरचे बटण लावण्यास सांगत. आता 40-50 वर्षांनंतर कधी दादांची वर भेट झाली, तर मी हे बटण त्यांच्यापुढे लावेन. तोपर्यंत हे बटण असेच खुले असेल. यामुळे त्यांची रोज आठवण येईल, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी सुनेत्रा पवार यांना सर्वोतपरी मदत करण्याची ग्वाहीही दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत अजित पवारांचा शोकप्रस्ताव मांडला. त्यावर बोलताना आज अनेक नेते भावूक झाले. यात अजित पवारांचे पुतणे तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांचाही समावेश होता. रोहित यांना अजित पवारांच्या आठवणी सांगताना आज सभागृहाच्या पटलावर अश्रू अनावर झाले. यावेळी त्यांनी अजितदादांच्या अपघातासाठी दोषी असणाऱ्यांना तुरुंगात पाठवल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचा निर्धारही बोलून दाखवला.
रोहित पवार आपल्या काकांची आठवण सांगताना म्हणाले, एकदा अजितदादा मला म्हणाले होते की, रोहित तुझ्या झिपऱ्या फार वाढल्यात. त्या कमी कर. दादा गेले, त्या दिवशी मी त्यांना आदरांजली म्हणून मी माझे केस कापले. अजितदादा मला नेहमी म्हणायचे की, तुझे शारीरीक वजन वाढत आहे. शारीरीक वजन कमी कर व राजकीय वजन वाढव. मी त्यावर फक्त हो असे म्हणायतो. मी अजितदादांना शब्द तो. माझी हेअरस्टाईल ही अशीच ठेवेन. शारीरीक वजन कमी करून राजकीय वजन वाढवेन.
तोपर्यंत मी माझे वरचे बटण लावणार नाही. ते पुढे म्हणाले, अजितदादा मला नेहमी म्हणायचे, रोहित तुझे शर्टचे वरचे बटन लावत जा. पण मी एक मात्र सांगतो, आजपासून 40-50 वर्षांनंतर मी जेव्हा अजितदादांना भेटण्यास जाईन तोपर्यंत मी हे बटण लावणार नाही. कारण, हे बटण मला रोज तुमची आठवण देत राहील. माझी वर त्यांच्याशी भेट होईन तेव्हा त्यांच्यापुढेच मी हे बटन लावेन. तोपर्यंत माझा हा लढा असाच सुरू राहील. मी त्यांच्यापुढे ताठ मानेने उभा राहीन. त्यावेळी काका माझ्या पाठीवर हात ठेवून म्हणेल, लढलास बरं का.
या गोष्टी ऐकण्यासाठी मी हा लढा सुरू ठेवला आहे. दादांच्या अपघातासाठी जो कुणी दोषी असेल, मग तो कितीही का मोठा असेना, त्याला तुरुंगात टाकल्याशिवाय व शिक्षा दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. काकी (सुनेत्रा पवार), तुमच्या राजकीय प्रवासात तुमच्या पुतण्याची ज्यावेळी गरज लागेल, त्यावेळी मी तयार असेन, असेही रोहित पवार यावेळी बोलताना म्हणाले.
रोहित पवार यांनी यावेळी अजित पवारांवर झालेल्या आरोपांवरही भाष्य केले. ते म्हणाले, दादांबरोबर काम करत असताना त्यांच्याविषयी काही बिनबुडाच्या गोष्टी बोलल्या जायच्या. तेव्हा दादांना खूप वाईट वाटायचे. जनतेच्या विकासाचे राजकारण करत असताना त्यांच्यावर नको – नको ते आरोप झाले. ज्या दादांनी आयुष्यभर स्वच्छतेचा आग्रह धरला त्यांच्या अंगावर आरोपाचे डाग उडवले गेले. त्यावेळी ते किती अस्वस्थ व्हायचे हे आम्हा सगळ्यांना माहिती आहे. विशेष म्हणजे, यातील एकही आरोप या मंडळींना सिद्ध करता आला नाही. उलट ज्यांनी त्यांच्यावर आरोप केले त्यांनीच नंतरच्या काळामध्ये त्यांची प्रशंसा केली हे आपण सर्वांनी पाहिले.
मी विनंती करतो की, आज दादा आपल्यामध्ये नाहीत. त्यांच्यावर झालेले आरोप कधीच सिद्ध झाले नाही. ते आरोप असू शकतात किंवा राजकीय भाषण असू शकते. त्यामुळे त्यांच्यावरील डाग पुसता आले तर पुसा. देवेंद्र फडणवीस हे दादांचे जिवलग मित्र म्हणून ओळखले जातात. त्यांना मी विनंती करतो की हे सगळे खोटे आरोप एका गाठोड्यात भरून समुद्रात टाकून दिले, तर मग ती खऱ्या अर्थाने आदरांजली म्हणता येईल, असे रोहित पवार म्हणाले

