पुणे: येथील बाणेर भागात विकसित करण्यासाठी दिलेल्या मिळकतीच्या व्यवहारात फसवणूक झाल्याने एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याने नियोजित गृहप्रकल्पातून उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणी ज्येष्ठाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून दोन बांधकाम व्यावसायिकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नरेश उमाकांत महाजन (वय ६९, रा. अंबरनाथ पूर्व, जि. ठाणे) असे आत्महत्या केलेल्या ज्येष्ठाचे नाव आहे. त्यांचा मुलगा मयूर नरेश महाजन (वय ४१, रा. अंबरनाथ पूर्व, जि. ठाणे) यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार, बांधकाम व्यावसायिक जयंतीलाल ताराचंद ओसवाल (वय ५६) आणि रिषभ ओसवाल (वय ३०, दोघे रा. भवानी पेठ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेश महाजन हे महावितरणमध्ये अधिकारी होते. त्यांनी बाणेर येथे एक जागा घेतली होती, जी त्यांनी ‘स्विटी असोसिएटस’चे जयंतीलाल ओसवाल यांना विकसित करण्यासाठी दिली होती. करारानुसार, विकसित केलेल्या जागेवर त्यांना सदनिका मिळणार होती. मात्र, ओसवाल यांनी कराराचे पालन केले नाही आणि त्यांना सदनिका दिली नाही. यामुळे महाजन नैराश्यात होते.
महाजन यांच्या जागेवर सात मजली गृहप्रकल्प साकारण्यात आला असून, त्याचे बांधकाम पूर्ण झाले आहे. १६ फेब्रुवारी रोजी महाजन बाणेर येथील या गृहप्रकल्पाच्या आवारात आले. त्यांनी कराराप्रमाणे सदनिका देण्याबाबत ओसवाल यांच्याकडे विचारणा केली. त्यावेळी बांधकाम व्यावसायिकांनी त्यांना मानसिक त्रास देऊन धमकावले, असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या घटनेनंतर नरेश महाजन यांनी नियोजित गृहप्रकल्पाच्या सातव्या मजल्यावर जाऊन तेथून उडी मारून आत्महत्या केली. मयूर महाजन यांच्या फिर्यादीनुसार, बांधकाम व्यावसायिकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक अनिल केकाण या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

