पुणे:राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पवार कुटुंबासह संपूर्ण राज्याला मोठा धक्का बसला आहे. या कठीण काळात कुटुंबाचा मुख्य आधारस्तंभ म्हणून खंबीरपणे उभे राहिलेले ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती पुन्हा एकदा काहीशी बिघडली आहे. त्यांना जाणवत असलेल्या प्रचंड अशक्तपणामुळे पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, शरद पवार यांच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याने त्यांना अशक्तपणा जाणवत आहे. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना सलाईन लावण्यात आली आहे. सध्या त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी डॉक्टरांची एक विशेष टीम तैनात करण्यात आली आहे. सध्या ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली निरीक्षणाखाली आहेत.रुग्णालया प्रशासनाने सांगितले की, शरद पवार यांना आज सौम्य डिहायड्रेशनमुळे रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले. त्यांना द्रवपदार्थांची आवश्यकता आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. ते २ दिवस रुबी हॉल क्लिनिकमध्ये राहतील आणि नंतर त्यांना घरी पाठवण्यात येईल.
काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी रुबी हॉल रुग्णालयात पाच दिवस उपचार घेतले होते. त्यावेळी शरद पवारांना छातीत संसर्ग झाला होता त्यामुळे त्यांना खोकला आणि कफचा त्रास जाणवत होता. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांच्या विविध वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. सर्व तपासण्यांचे अहवाल समाधानकारक असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले होते. त्यांच्या ऑक्सिजनची पातळी आणि इतर जीवनावश्यक निकष सामान्य मर्यादेत असल्याचेही सांगण्यात आले होते.
प्रकृतीत सुधारणा झाल्याने पाच दिवसानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते आणि ते पुण्यातील निवासस्थानी विश्रांती घेत होते. मात्र, आज पुन्हा अशक्तपणा वाढल्याने खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात निधन झाले होते. त्याचा मोठा धक्का शरद पवारांसह त्यांच्या कुटुंबीयांना बसला होता. त्यांनी सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार यांच्या भेटीगाठी घेऊन पवार कुटुंबाला सावरण्याचा प्रयत्न केला होता. अजित पवार यांच्या निधनानंतर शरद पवार सातत्याने श्रद्धांजली कार्यक्रम व भेटीगाठींमध्ये व्यस्त होते. यामुळे त्यांची दगदग वाढली होती. त्यातच गत काही दिवसांपासून प्रकृती बरी नसल्यामुळे त्यांनी सार्वजनिक कार्यक्रम टाळले होते.

