बदलापूर : येथे आंतरराज्यीय स्त्री बीज (एग सेल) तस्करी करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला. गरिबी आणि आर्थिक विवंचनेतील ३०० महिलांच्या शरीराचा या टोळीने प्रत्येकी २० हजार रुपयांत सौदा केल्याचे प्राथमिक तपासात निदर्शनास आले आहे. यात मुख्य सूत्रधारासह तीन महिलांना अटक करण्यात आली असून बड्या डॉक्टरांचे कनेक्शन पोलिसांच्या रडारवर आहे. उल्हासनगर परिमंडळ ४ चे पोलिस उपायुक्त सचिन गोरेंनी सांगितले की, या टोळीचे धागेदोरे केरळ, तामिळनाडू, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशपर्यंत पसरलेले आहेत.
बदलापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योत्स्ना सावंत यांच्याकडे पहिली तक्रार आली होती. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यावरून कारवाई झाली. आणि या काळ्या धंद्याची सूत्रधार सुलक्षणा गाडेकरसह (४४) तिच्या साथीदार अश्विनी चाबुकस्वार (२९) आणि मंजुषा वानखेडेला (४६) अटक करण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, ही टोळी झोपडपट्टी आणि गरीब वस्त्यांमधील महिलांना गाठून २० हजार रुपयांचे आमिष दाखवत असे. त्यानंतर सुलक्षणा स्वतःच्या घरातच महिलांना इंजेक्शन्स टोचून त्यांच्या शरीरात स्त्री-बीजांची अनैसर्गिक वाढ घडवून आणत होती. मग महिलांना विविध आयव्हीएफ केंद्रांत नेऊन बेकायदेशीर शस्त्रक्रियेने अंडाशय बाहेर काढले जात होते. एका अंडाशयासाठी टोळी लाखांची कमाई करत असताना पीडित महिलांच्या हाती २० हजारच ठेवले जात असत. पोलिसांना मुख्य आरोपी सुलक्षणा गाडेकरच्या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये अंडाशय विक्रीचे सर्व व्यवहार, कोणत्या हॉस्पिटलला किती बीजांडे पुरवली आणि त्या बदल्यात किती रक्कम मिळाली, याची माहिती मिळाली आहे. धक्कादायक म्हणजे, पीडित महिलांची संमती असल्याचे भासवण्यासाठी आरोपींनी खोट्या नावांनी अनेक बनावट प्रतिज्ञापत्रे तयार केली होती. यात वापरल्या जाणाऱ्या जीवघेण्या इंजेक्शनचे तपशील आणि व्यवहारांचे फोटो आता या गुन्हेगारांना न्यायालयाच्या पिंजऱ्यात उभे करण्यासाठी सर्वात मोठा पुरावा ठरणार आहेत.
एक्स्पर्ट व्ह्यू:
अ) वैद्यकीय देखरेखीशिवाय ‘एग हार्वेस्टिंग’ महिलांच्या जिवावर बेतण्याची भीती अशा इंजेक्शनचा काय परिणाम होतो ?
- स्त्री-बीज विकसित करण्यासाठी वैद्यकीय देखरेखीखाली ‘हार्मोनल मेडिकेशन’ आवश्यक असते. तसे न झाल्यास ओव्हरीजवर ताण येऊन महिलेच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.
ब) एकुणात या प्रक्रियेतील धोके काय आहेत ?
- आयव्हीएफमध्ये एग हार्वेस्टिंग प्रक्रिया अत्यंत सूक्ष्म आणि तांत्रिक असते. अशा टोळ्यांमुळे संसर्गाचा आणि प्रजनन क्षमता कमी होण्याचा धोका असतो.
क) अशा टोळ्यांवर कडक कारवाईचा कायदा नाही का ?
- आर्ट (सहायक प्रजनन तकनीक ) कायद्यानुसार अंडी गोठवणे आणि संकलन करणे यासाठी कडक नियमावली आहे. मात्र, नियम पाळण्यावर देखरेखीची प्रभावी यंत्रणा नाही.

