अधिकाऱ्यांनो, चांगले काम करा, लिहिते व्हा अन् लोकाभिमुखता जपा!महेश भागवत यांचे आवाहन ; दुसऱ्या शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन
पुणे : शासकीय साहित्य संमेलन होत आहे, त्याचा खूप आनंद आहे. खरंतर शासकीय अधिकारी हे सर्वाधिक माणसांशी रोज भेटत असतात. त्यांची कामे करत असतात. लोकांच्या अडचणी, समस्यांवर फुंकर घालत असतात. अधिकाऱ्यांकडे सहवेदना, कार्यक्षमता असते आणि त्यामुळे त्यांनी आपले काम चोख करायला हवे. भ्रष्टाचार होऊ नये हे लोकांना अभिप्रेत असते. कारण आता समाजाची सहनशक्तीची मर्यादा संपली आहे. म्हणून चांगली कामे करा, चांगले लिहा, लोकाभिमुखता जपा असा संदेश दुसऱ्या राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व तेलंगणा राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक महेश भागवत यांनी दिला. शासकीय भाषा समजण्यास अतिशय किचकट असते. अधिकाऱ्यांनाही ती कधीकधी कळत नाही. शासकीय भाषेत सुधारणा करण्यासाठी शासनाने समिती नियुक्त करावी, अशी सूचनाही त्यांनी केली.
पुणे महापालिका, यशदा व संवाद पुणे यांच्या वतीने दुसरे राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी भागवत यांनी अधिकारी वर्गाशी संवाद साधला. उपमहापौर परशुराम वाडेकर, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष भारत सासणे, यशदाचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड, अतिरिक्त जिल्हाधिकारी राजीव नंदकर, जीएसटी गुजरातचे प्रधान आयुक्त सुरेंद्रकुमार मानकोसकर, ओडिसा राज्यात काम करणारे मराठी सनदी अधिकारी विजय कुलंगे, मराठी भाषा विभागाचे प्रमुख किरण कुलकर्णी, संवाद पुणेचे प्रमुख सुनील महाजन मंचावर होते.
भागवत म्हणाले, पुणे विचारांचे ऊर्जेचे केंद्र आहे. येथे संमेलनाचे अध्यक्षपद भूषवताना आनंद होत आहे. ही निवड प्रशासनातील प्रशासकीय संवेदनाशीलतेची आहे. अधिकाऱ्यांना पुस्तके वाचण्यापेक्षा माणसांना अधिक वाचण्याची संधी मिळते. अधिकाऱ्यांना माणसे भेटायला येतात आणि त्यांना खूप काही शिकवतात. अधिकारी तेच साहित्यात उतरवतात. त्यामुळे ते साहित्य अस्सल वास्तववादी ठरते. अधिकाऱ्यांच्या लिखाणाचा फायदा समाजाला होतो.
मराठी तरुणांनी आयएएसमध्ये जावे यासाठी काम करत आहोत. मराठी विद्यार्थी आयएएस परिक्षेत देशात पहिल्या क्रमांकाने उत्तीण होत नाही याची खंत आहे. मराठी मुलांना स्पर्धा परीक्षेतील मुलाखतीचे बाळकडू द्यायला हवे. त्यासाठी आम्ही वरिष्ठ अधिकारी प्रयत्न करत आहोत, असेही भागवत म्हणाले.
एआयचा मराठी साहित्यावर काय परिणाम होणार या विषयी भागवत म्हणाले, एआयमुळे अनेकांच्या नोकऱ्या जातील, असा धोका आहे. पण एआयमध्ये संवेदना नाहीत. त्यांची भाषा तांत्रिक आहे. बोली भाषेचा त्यात वापर होणार नाही. पण एआयचा वापर करून आपण जुने ग्रंथ, पोथ्या जतन करू शकतो. एआयला देखील स्वीकारून उपयोगात आणले पाहिजे. धोका ओळखून आपणच त्यात पारंगत व्हावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
आज पालक आपल्या मुलांना रिल्स बनविण्यात मदत करतात आणि तेच इतरत्र पाठवतात. रिल्स बनविण्यासाठी मदत न करता मुलांना रिअल हिरो बनविण्यासाठी मदत करणे अपेक्षित आहे, असेही भागवत यांनी सांगितले.
भारत सासणे म्हणाले, आपण या संमेलनामध्ये सातत्य ठेवले पाहिजे. कारण शासकीय अधिकारी हा बुध्दीमान वर्ग आहे. त्यांना दुष्काळ, शेतकरी आत्महत्या अशा सर्व प्रश्नांची जाण असते. त्यावर ते काम करू शकतात. त्यामुळे त्यांनी हे सर्व अनुभव पुस्तकरूपाने समोर आणावेत. साहित्याला त्यांचे मोठे योगदान होऊ शकते. शासकीय अधिकारी हे लेखक होतात, याला खूप मोठा इतिहास आहे, परंपरा आहे. लेखकांना साहित्यनिर्मितीसाठी फिरावे लागते तेवढे अधिकाऱ्यांना फिरावे लागत नाही. त्यांना खुर्चीत बसून सर्व काही मिळते.
सुरेंद्रकुमार मानकोस्कर म्हणाले, आज आपण मोबाईलमुळे वाचन कमी करत आहोत. पण अशा संमेलनामुळे पुन्हा पुस्तकांकडे वळता येते. म्हणून अशी संमेले होणे अत्यंत गरजेचे आहे.
परशुराम वाडेकर म्हणाले, सध्या अनेक अधिकारी चांगले लेखन करत आहेत. त्यामुळे त्यांनी लेखनात सातत्य ठेवून समाजासाठी योगदान द्यावे. सर्वसामान्य नागरिक त्यांच्याकडे व्यथा मांडत असतात, त्यामुळे त्यांना चांगले साहित्य निर्माण करण्यास वाव आहे.
शेखर गायकवाड म्हणाले, साहित्यात अधिकाऱ्यांचा खूप प्रभाव आहे. इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये अधिकाऱ्यांचे साहित्य पहायला मिळते. पु. ल. देशपांडे आकाशवाणीवर होते, तसेच वि. स. खांडेकर हे शिक्षक होते. त्यामुळे त्यांचे लेखन तर सर्वांना माहिती आहे. अधिकाऱ्यांना बेरकी, इरसाल माणसे भेटतात. त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळते. त्यातूनच साहित्य निर्मिती होऊ शकते. सरकारी जीआरची किचकट भाषा बदलायला हवी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
राजीव नंदकर यांनी प्रास्ताविक केले. राजस्विनी थोरात यांनी सूत्रसंचालन केले. सुनील महाजन यांनी आभार मानले.
फोटो ओळ : शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी (डावीकडून) विजय कुलंगे, सुनील महाजन, शेखर गायकवाड, महेश भागवत, भारत सासणे, परशुराम वाडेकर, सुरेंद्रकुमार मानकोसकर, राजीव नंदकर.

