पुणे: शहरातील गुडलक चौकातील ऐतिहासिक कलाकार कट्टा स्थलांतरित करण्याच्या हालचालींविरोधात आज राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या वतीने सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत भव्य सह्यांची मोहीम राबविण्यात आली . पुण्याच्या सांस्कृतिक अस्मितेचे प्रतीक असलेल्या या कलाकार कट्ट्यावर गदा आणण्याचा कोणताही प्रयत्न आम्ही ठामपणे हाणून पाडू. असे मत राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील म्हणाले,
आमच्याकडे प्राप्त झालेल्या माहितीनुसार, स्थानिक भाजपचे काही नगरसेवक महापालिका आयुक्तांवर प्रचंड दबाव आणून हा कलाकार कट्टा हटवण्याचा प्रयत्न करत आहेत. एवढ्यावरच न थांबता, कलाकार कट्ट्याच्या मागील बाजूस असलेल्या बंगल्याच्या प्रस्तावित रीडेव्हलपमेंट प्रकल्पाला मोठे फ्रंटेज व व्यावसायिक लाभ मिळावा यासाठी कट्टा हटवण्याची घाई सुरू असल्याची माहिती स्थानिक कलाकार व नागरिकांकडून मिळत आहे. जर ही बाब खरी असेल, तर हा प्रकार केवळ सांस्कृतिक वारशावर घाला नसून थेट व्यावसायिक स्वार्थासाठी पुण्याच्या अस्मितेची केलेली तडजोड आहे.
पुणेकरांच्या भावनांशी खेळ करून, कलाकारांच्या व्यासपीठावर बुलडोझर चालवण्याचा डाव आम्ही सहन करणार नाही. भाजपच्या धोरणांविरोधात शहरात वाढत असलेल्या रोषाला घाबरून सांस्कृतिक ठिकाणे लक्ष्य केली जात आहेत का? असा सवालही नागरिक उपस्थित करत आहेत.
या सह्यांच्या मोहिमेला युवक-युवती, ज्येष्ठ नागरिक, कलाकार, साहित्यिक आणि सर्वसामान्य पुणेकरांचा उत्स्फूर्त व प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. हा केवळ निषेध नाही, तर पुण्याच्या सांस्कृतिक स्वाभिमानाचा जाहीर एल्गार आहे.
आमची ठाम भूमिका —
“कलाकार कट्टा हटविण्याचा कोणताही डाव आम्ही उधळून लावू!”
पुण्याच्या सांस्कृतिक ओळखीवर आघात करणाऱ्यांना जनतेसमोर उभे करूनच हा लढा संपेल.
बाबासाहेब पाटील: प्रदेशाध्यक्ष-
राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभाग,
कलाकार कट्टा,हटविण्यामागील राजकारण उघड, सह्यांची मोहीम सुरू…
Date:

