LIVE – पुणे महापालिका मुख्य सभा 18 फेब्रुवारी 2026
पुणे महापालिका प्रशासनाने पुणेकरांवर लादलेली ५ टक्के मिळकतकरातील वाढ आज झालेल्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी एकमुखाने फेटाळून लावली. प्रशासनाने उत्पन्नवाढीसाठी करवाढ करण्यापेक्षा नागरिकांना चांगली वागणूक द्यावी, त्यांची कामे वेळेत केले तरी उत्पन्न वाढेल अशा शब्दात नगरसेवकांनी प्रशासनानेच कान टोचले.
महापालिकेच्या मिळकतकर विभागाने १० टक्के कर वाढीचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवला होता. त्यावरून प्रशासनावर टीकेची झोड उठल्याने प्रशासनाने १० टक्के ऐवजी ५ टक्के कर वाढ करण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत घेतला होता. यामध्ये सर्वसाधारण करात ३ टक्के आणि पथ करात २ टक्के वाढ सुचविण्यात आली होती. यावर २० फेब्रुवारीच्या आत निर्णय घेणे बंधनकारक होते. त्यानुसार आज सर्वसाधारण सभेत यावर निर्णय घेतला.
दरम्यान भाजपची महापालिकेत सत्ता आल्यानंतर पहिल्याच सर्वसाधारण सभेत मिळकतकर वाढीबाबत निर्णय घ्यावा लागणार होता. म्हणून पुणेकरांना भाजप करवाढीचा धक्का देणार का याकडे लक्ष लागले होते. पण भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना (युबीटी) या सर्वच पक्षाच्या नगरसेवकांनी यास विरोध केला. उपसूचना देऊन हा प्रस्ताव फेटाळून लावण्यात आला.
या प्रस्तावावर बोलताना सर्वपक्षीय नगरसेवकांनी मिळकत कर विभागात नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल अधिकाऱ्यांना धारेवर धरले. मिळकतकरातील वाढ रद्द केली हे चांगले झाले. अनेक नागरिक क्षेत्रीय कार्यालयामध्ये कर लावून द्यावा यासाठी येतात, पण त्यांची कामे अधिकारी करत नाहीत. अनेकदा पैशाची मागणी केल्याच्या तक्रारीही येतात. त्यामुळे प्रशासनाने कामात सुधारणा करावी.
मिळकतकराचा प्रश्न आपण गांभीर्याने घेतो, पण प्रशासन गांभीर्याने घेत नाही. बिल्डरने भोगवटा प्रमाणपत्र घेतल्यानंतर त्याने न भरलेली रक्कम ग्राहकाला भरावी लागते. त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. यावर ठोस निर्णय घेतला पाहिजे.
अधिकारी नागरिकांचा छळ करत आहेत. ४० टक्के सवलतीचे अनेक प्रस्ताव प्रलंबीत आहेत. असे मुद्दे नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत मांडले. वर्षा अधतापकीर, अजय खेडेकर, सचिन दोडके, अर्चना पाटील, सुभाष नाणेकर, अजित घुले, अरविंद शिंदे, काका चव्हाण, नीलेश निकम आदींनी यावेळी भूमिका मांडली.
समाविष्ट गावांसाठी विशेष सभा
महापालिकेत समाविष्ट झालेल्या समाविष्ट ३२ गावांमध्ये मिळकतकराच्या आकारणीवरून पेच निर्माण झालेला आहे. त्यावरून नगरसेवकांनी सर्वसाधरण सभेत मुद्दा उपस्थित केला. त्यावर सभागृहनेते गणेश बिडकर यांनी भूमिका मांडली. ”शासनाकडून आलेले आदेश आणि महापालिकेच्या कर आकारणीची पद्धत यावरून वाद निर्माण झालेला आहे.
त्यामुळे या विषयाची सर्व माहिती सर्वसाधारण सभेला मिळाली पाहिजे. त्यामुळे प्रशासनाने शासनाचे आदेश, महापालिकेचा कायदा, वस्तुस्थिती याबाबतचा आदेश महापौरांकडे द्यावा, तो अहवाल सर्व नगरसेवकांना दिला जाईल. या विषयावर विशेष सभा आयोजित करून त्यात चर्चा करून निर्णय घेऊयात,असे बिडकर यांनी सांगितले. त्यास सर्व नगरसेवकांनी अनुमोदन दिले.
पाणी रे पाणी…
शहराच्या काही भागांमध्ये मागील अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या पाण्याच्या समस्यांच्या जोरदार पाढा वाचत नगरसेवकांनी पहिल्याच सर्वसाधारण सभेमध्ये प्रशासनास धारेवर धरले. १०-१५ दिवसांपासून अपुरा तसेच कमी दाबाने येणारे पाणी, अनेक भागांमध्ये होणारा दूषित पाण्याचा पुरवठा आणि अनियमित पाणी पुरवठा, अशा प्रकारे तक्रारी मांडत संताप व्यक्त केला.जुन्या नगरसेवकांबरोबरच पहिल्यांदाच निवडून आलेल्या नगरसेवकांनीही आपल्या भागातील प्रश्नावर आवाज उठविला.
शहराच्या वेगवेगळ्या भागात जानेवारीपासूनच पाणी समस्या सुरु झाली आहे. त्याचे पडसाद बुधवारी झालेल्या महापालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेमध्ये उमटले. कोंढवा परिसरामध्ये १० ते १५ दिवसांपासून पाणी पुरवठा होत नसल्याची तक्रार नगरसेवक हाजी गफूर पठाण यांनी केली.
महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडे दररोज पाठपुरावा करूनही प्रशासन दखल घेत नाही. रमजान महिना व शिवजयंतीच्या काळातही नागरिकांना पाणी मिळत नसल्याबद्दल पठाण यांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. त्यापाठोपाठ नगरसेविका वैशाली बनकर यांनी सासवड रोड परिसरामध्ये जलवाहिनीमध्ये सांडपाणी जात आहे.
या दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य बिघडले आहे, प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही प्रशासन त्याची गांभीर्याने दखल घेत नसल्याचा आरोप बनकर यांनी केला. नगरसेविका अश्विनी लांडगे, नगरसेवक विशाल मलके यांनी येरवडा परिसरातील दूषित पाण्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याचे सांगितले.
दरम्यान, ताडीवाला रोड परिसरात पहाटे २ ते ३ या वेळेत पाणी सुटते, कष्टकऱ्यांनी पाणी भरायचे केव्हा ? असा सुमय्या नदाफ यांनी प्रश्न उपस्थित केला. तसेच पाणी सोडण्याच्या वेळेत बदल करण्याची मागणी केली. दरम्यान, नगरसेवक प्रशांत जगताप यांनीही वानवडी, कोंढवा परिसरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याचे सांगून हा पाणी पुरवठा पुर्ववत करण्याची मागणी केली.
नगरसेवकांकडून पाणी प्रश्नावर आवाज उठविला जात असतानाही प्रशासनाकडून खुलासा होत नसल्यामुळे नगरसेवकांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी पाणी समस्येवर खुलासा केला.
‘काही परिसरामध्ये जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम केले जात असल्यामुळे तसेच काही ठिकाणी नवीन जलवाहिनी टाकली जात आहे. त्यामुळे पाणी पुरवठा करताना विस्कळीतपणा आला आहे. ड्रेनेज विभागाकडून वर्गीकरणाद्वारे काही निधी उपलब्ध करून दिला आहे, त्यातून कोंढवा, महमदवाडी, हडपसर व अन्य परिसरातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी तातडीने काम केले जाईल, काही ठिकाणी पाण्याच्या टाक्या बांधल्या आहे.
मात्र जलवाहिन्या टाकण्याची कामे सुरु आहेत. दूषित पाणी येत असलेल्या ठिकाणी भेटी देऊन हा प्रश्न तातडीने सोडविला जाईल, असे जगताप यांनी स्पष्टीकरण दिले. दरम्यान, महापौर मंजूषा नागपुरे यांनी नगरसेवकांच्या तक्रारींची दखल घेत क्षेत्रीय कार्यालय स्तरावर बैठका घेऊन पाणी प्रश्न तातडीने सोडविण्याचे आदेश प्रशासनास दिले.
सांडपाणी वाहिन्यांच्या कामांवरूनही प्रशासनावर टिका
जनता वसाहतीमध्ये सांडपाणी वाहिन्यांची कमतरता असून त्या खराब झाल्या आहेत. त्यामुळे सांडपाणी रस्त्यावर येऊन नागरिकांना चालणे मुश्कील होत आहे. जनता वसाहत व सिंहगड रस्ता परिसरात जाण्यासाठी नागरिकांकडून कॅनॉल रस्त्याचा वापर केला जातो. या प्रश्नाकडेही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नगरसेविका प्रिया गदादे, नगरसेवक सुरज लोखंडे यांनी केला.
कोंढव्यामध्येही सांडपाणी वाहिन्यांची समस्या गंभीर आहे, वाहिन्या जुन्या झाल्या असून त्या तातडीने बदलण्याची गरज असल्याची मागणी नगरसेवकांनी केली. त्यावर मलनिःसारण विभागाचे जगदीश खानोरे यांनी सांडपाणी वाहिन्यांसंबंधी तक्रारी असणाऱ्या ठिकाणी पाहणी करून हा प्रश्न सोडविला जाईल, असे सभेत सांगितले.

