यूके अभ्यासदौऱ्यात महत्त्वपूर्ण चर्चा
मुंबई, दि. १७ फेब्रुवारी २०२६ : विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या सध्या १५ ते २१ फेब्रुवारी २०२६ दरम्यान आयोजित महाराष्ट्र विधिमंडळाच्या माननीय पीठासीन अधिकाऱ्यांच्या यूके अभ्यास दौऱ्यावर आहेत. यादरम्यान आज त्यांनी ब्रिटनमधील भारताचे उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांची भेट घेतली. या भेटीत महाराष्ट्र विधानमंडळाचे कामकाज, तसेच Commonwealth Parliamentary Association (CPA) च्या बार्बाडोस येथे झालेल्या परिषदेमधील मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली.
डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, लंडनमधील महाराष्ट्र मंडळ लंडन यांना महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या मदतीच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी विशेष सहकार्य करण्याची विनंती त्यांच्या समवेत असलेल्या महाराष्ट्र मंडळ , लंडनचे वैभव खांडगे आणि वृषाल खांडके यांनी उच्चायुक्तांकडे केली.
या भेटीत भारतीय दूतावासात सुरक्षा जबाबदारी सांभाळणारे वरिष्ठ अधिकारी किरण भोसले (मुंबई पोलीस) यांच्याशीही संवाद झाला. मध्यंतरी उद्भवलेल्या प्रश्नांमध्ये तिरंगा ध्वजाचे प्रभावी संरक्षण करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. तसेच मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या काळातही त्यांचे योगदान उल्लेखनीय राहिले असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले.
दरम्यान, महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचेही आगमन झाले असून, पुढील कार्यक्रम आणि इतर प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली.
ब्रिटनमधील काही विषयांवर पुढील पाठपुरावा करण्यात येणार असल्याचेही डॅा. नीलमताई गोर्हे यांनीच सांगितले.

