देशातील ज्वलंत प्रश्नावरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी टिपू सुलतानच्या मुद्द्यावरून भाजपाची नौटंकी.
मुंबई, दि. १६ फेब्रुवारी २०२६
अदानी-अंबानी आणि अमेरिकेचे भले करणाऱ्या, संविधान बदलू पाहणाऱ्या भाजपला मी एक्सपोज करतो म्हणून भाजपाला माझी जीभ कापायची असेल तर खुशाल कापा, पण मी थांबणार नाही, भाजपाचा पर्दाफाश करतच राहणार असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावून सांगितले आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, भाजपा आमदार व नेत्यांनी “माझी जीभ कापून आणणाऱ्याला बक्षीस जाहीर केले आहे, माझी जीभ कापल्यानंतर जर भारतीय शेतकर्यांचे अमेरिकेतून होणार्या आयातीपासून संरक्षण होणार असेल, ही अन्यायकारक ट्रेड-डील रद्द होऊन शेतमालाला भाव मिळणार असतील, शेतकरी कर्जमुक्त होणार असेल, भाजप हिंदू-मुस्लिम द्वेषाला खतपाणी घालणार नसेल, चीनने बळकावलेला भूभाग परत मिळणार असेल तर माझी जीभ नक्की कापा.
सपकाळ पुढे म्हणाले की, मी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल काहीही चुकीचे बोललो नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांची किर्ती महान आहे, चंद्र जसा वाढत जातो तशीच महाराजांची किर्ती आणखी वाढत जावी, याबाबत दुमत नाही. परंतु भारतीय जनता पक्षाने माझ्या विधानाचा “ध” चा “मा” करून महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न केला, दंगली घडवण्याचा प्रयत्न केला, यामागचे कारस्थान समजून घेतले पाहिजे. एपस्टिन फाईल्समध्ये बरंच काही दडलेलं आहे, त्यावरून जनतेचे लक्ष विचलित करणे हा एक भाग आहे तर अमेरिकेबरोबरच्या व्यापार करारामुळे भारतातील शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्थ होणार आहे, महाराष्ट्रातही अनेक ज्वलंत प्रश्न आहेत. या सर्व मुद्द्यावर भाजपा सरकारकडे उत्तर नाही म्हणून या प्रश्नांवर भाजपाला पडदा टाकायचा आहे, यासाठी हा सर्व खटाटोप सुरु आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

