भारत विकास परिषद विकलांग केंद्र पुणे यांचे सहकार्य; ५ डिसेंबरला बावधनमध्ये होणार शिबीर
पुणे : सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्युट्सच्या सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स, कॉलेज ऑफ फिजिओथेरपी आणि भारत विकास परिषद विकलांग केंद्र पुणे यांच्या सहकार्याने सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्युट्सच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त, तसेच ‘इंटरनॅशनल डे ऑफ पर्सन विथ डिसॅबिलिटीज’ या दिनाचे औचित्य साधून पाचव्या मोफत कॅलिपर्स वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिराचे आयोजन सोमवार, दि. ५ डिसेंबर २०२३ रोजी सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स व कॉलेज ऑफ फिजिओथेरपी बावधन पुणे येथे सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत करण्यात आले आहे. शिबिरात २५ जणांना कॅलिपर्सचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. यासाठी पूर्व नावनोंदणी आवश्यक असून, जयंत साठे (९८२०७३०४५३) आणि डॉ. कांचन गोडे (७२६२०११७७४) यांचेशी त्यासाठी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
समाजातील दिव्यांग व्यक्तींना सर्वसाधारण जीवनमान जगता यावे, या दृष्टिकोनातून या कृत्रिम हात-पायांची निर्मिती करण्यात आली आहे. ज्या व्यक्तींना वरच्या टोकाच्या कृत्रिम अवयवांची गरज आहे, त्यांनाही उपकरणाच्या अधिक गतिशीलतेचा फायदा होतो. कृत्रिम पाय किंवा कृत्रिम अवयव, पाय विच्छेदन झालेल्या लोकांना अधिक सहजतेने हालचाल करण्यास मदत करू शकतात. काही लोकांना कृत्रिम पाय घेऊन चालण्यासाठी अजूनही छडी, वॉकर किंवा क्रॅचची आवश्यकता असते, तर काहींना मुक्तपणे चालता येते.
दिव्यांग बांधवांसाठी राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे त्यांच्या आयुष्यात नवचैतन्य निर्माण होते. या सामाजिक कार्यामुळे उपेक्षित-वंचित घटकास लाभ मिळणार असून, दिव्यांग बांधवांना समाजातील मुख्य प्रवाहात आणण्याचे अत्यंत महत्वाचे असे पुण्यकर्म सर्व स्तरासाठी कौतुकास्पद व अनुकरणीय आहे, असे सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी नमूद केले.
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया पुढे म्हणाले, “आपण समाजाचे काही तरी देणे लागतो व त्या ऋणातून गरजूंची सेवा घडावी, या उदात्त हेतूने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ‘सूर्यदत्त’ यंदा रौप्य महोत्सव साजरा करत आहे. गेल्या २५ वर्षाच्या कालावधीत संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यात पुढाकार घेण्यात आला आहे. जास्तीत जास्त लोकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. कात्रज, येरवडा, पिरंगुट, किवळे व पिंपरी-चिंचवड येथून वाहन व्यवस्था (पिकअप-ड्रॉप) केली आहे.”

