मालेगाव- येथील समाजवादी पक्षाच्या उपमहापौर शान-ए-हिंद निहाल अहमद यांनी त्यांच्या दालनात छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांऐवजी टिपू सुलतानचा फोटो लावला. याविरुद्ध एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेने आक्रमक आंदोलन केल्यावर तो फोटो हटवण्यात आला. मात्र, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानचे शौर्य छत्रपती शिवाजी महाराजांसारखेच आहे, असे वक्तव्य केल्याने नवा वाद सुरू झाला.
सपकाळांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, यापेक्षा जास्त लांगूलचालन, जोडे चाटणं मी आयुष्यात कधी बघितलं नाही. टिपूचा फोटो लावण्याचे समर्थन करत सपकाळ म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य ज्या पद्धतीचं आहे. त्यांचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात लढा पुकारला होता आणि त्या अर्थाने टिपू सुलतान हे शौर्य गाजवणारे एक योद्धे भारताचे भूमिपुत्र होऊन गेले. शौर्याचे लक्षण म्हणून आपण टिपू सुलतान यांना शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे.

