मुंबई-मेट्रो पुलाचा स्लॅब कोसळून 1 जण ठार व 3 जण जखमी झाल्याची घटना मुंबईच्या मुलुंड पश्चिम परिसरातील एलबीएस रोडवर घडली आहे. ऐन वर्दळीच्या वेळी ही घटना घडल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. काँग्रेस व ठाकरे गटाने या प्रकरणी सरकारवर सडकून टीका करत सरकार व एमएमआरडीए प्रशासनाला मुंबईकरांच्या जीवाचे काहीही देणेघेणे नसल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे.
यासंबंधीच्या माहितीनुसार, मुलुंड पश्चिम परिसरातील एलबीएस रोडवर मेट्रो पुलाचे काम सुरू आहे. या पुलाच्या स्लॅबचा एक तुकडा शनिवारी दुपाीर 12.20 च्या सुमारास अचानक रस्त्याने जाणाऱ्या ऑटो व एका कारवर पडला. त्यात ऑटो व कारमधून प्रवास करणारे 3-4 जण जखमी झाले. या जखमींना तत्काळ लगतच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे उपचारादरम्यान एका जखमीचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीची ओळख अद्याप पटली नाही. गंभीर गोष्ट म्हणजे या ठिकाणी पुलाचे काम सुरू असतानाही बॅरिकेट्स लावण्यात आले नव्हते किंवा इतर योग्य ती उपाययोजनाही करण्यात आली नव्हती. त्यामुळे या प्रकरणी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
स्लॅब कोसळल्याच्या घटनेनंतर मुंबई अग्निशमन दल, स्थानिक पोलिस, मेट्रो प्राधिकरणाचे कर्मचारी व संबंधित विभागाचे कर्माचारी रुग्णवाहिकेसह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी संपूर्ण परिसर ताब्यात घेऊन वाहतूक वळवली. रस्त्यावर पडलेला ढिगारा हटवला. सध्या हा अपघात नेमका कशामु्ळे झाला? याचा तपास सुरू आहे. तसेच या प्रकरणी बांधकामाविषयी सुरक्षेच्या नियमांचे पालन करण्यात आले होते का? याचीही चौकशी केली जात आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे मुलुंड येथील लाल बहादूर शास्त्री (एलबीएस रोड) रोडवर गत अनेक महिन्यांपासून मेट्रोच्या मार्गिकेचे काम सुरू आहे. या प्रकरणी दररोज भलेमोठे गर्डर व स्लॅब वर-खाली चढवण्याचे काम सुरू असते. त्यातच आज ही दुर्घटना घडल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
मुंबई महापालिकेने या दुर्घटनेची माहिती देताना म्हटले आहे की, आज दुपारी 12.20 वा. मुलुंड (पश्चिम) येथील एलबीएस रोडवरील जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीजवळ मेट्रोच्या खांबाचा काही भोग कोसळला. बांधकाम सुरू असताना सिमेंट मेट्रोच्या खांबाचा काही भाग कोसळून रिक्षावर पडला. मुंबई अग्निशमन दल, पोलिस, मेट्रो कर्मचारी, वॉर्ड कर्मचारी आणि 108 रुग्णवाहिका सेवा घटनास्थळी उपस्थित आहेत. ऑटोरिक्षातील 3-4 जण जखमी झाल्याची शक्यता आहे.

