पुणे- पुण्याच्या नदीपात्रात कचरा , राडारोडा टाकून अगर अन्य मार्गाने नदी अस्वछ् करणारांना सोडणार नाही आणि अशा लोकांकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांनाही सोडणार नाही , कठोरात कठोर शासन होईल अशी स्पष्ट तंबी आज महापौर मंजुषा नागपुरे यांनी दिली आहे. महापालिका आयुक्त आणि तमाम प्रशासनाला याबाबत त्यांनी आपला इशारा कळविला आहे
महापौरांनी असे म्हटले आहे कि,’ शहरातील नदीपात्रांमध्ये काही ठिकाणी बेकायदेशीररीत्या राडारोडा, बांधकामातील मलवा व कचरा टाकण्याच्या घटना आढळून येत आहेत. ही बाब अत्यंत गंभीर असून यामुळे नदीचा नैसर्गिक प्रवाह बाधित होणे, पूरस्थिती निर्माण होणे तसेच पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता आहे.याबाबत संबंधित विभागास स्पष्ट निर्देश देण्यात येत आहेत की,नदीपात्रात राडारोडा टिळक पुलाच्या शेजारी टाकण्यात आला आहे. हा प्रकार गंभीर आहे. राडारोडा टाकण्याच्या प्रकार रोखण्यासाठी २४ तास भरारी पथक नेमले होते ते पथक सध्या काय करत आहे? प्रशासनाचा हा ढिसाळपणामुळे शहर घाण होत आहे. त्यामुळे ज्या भागातून राडारोडा नदीपात्रात टाकण्यात आला तेथील संबंधित आरोग्य निरीक्षक बांधकाम निरीक्षक यांच्यावर जबाबदरी निश्चित करावी तसेच राडारोडा अथवा कोणत्याही प्रकारचा कचरा टाकणाऱ्या व्यक्ती, ठेकेदार किंवा संस्थांवर तात्काळ दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात यावी. आवश्यकतेनुसार गुन्हा दाखल करून संबंधितांवर कठोर शिक्षा करण्यात यावी.
तसेच, यापुढे अशा घटना घडू नयेत यासाठी सर्व वॉर्ड ऑफिसर व संबंधित पालिका अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील नदीपात्रांची नियमित पाहणी करावी. संशयास्पद हालचाली आढळल्यास तत्काळ कारवाई करावी. गरज असल्यास सीसीटीव्ही, ड्रोन कॅमेरे सर्वेलांस तसेच विशेष पथक नेमून नियंत्रण ठेवावे.नदी स्वच्छता व संवर्धन ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. नागरिकांनी देखील अशा प्रकारची माहिती संबंधित क्षेत्रिय कार्यालयास तात्काळ कळवावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

