शहराच्या मध्यवर्ती भागातील भुयारी मार्गांचा डीपीआर तात्काळ करा! -आ.हेमंत रासने
पुणे-पुण्यात ५४ किमी भुयारी मार्ग निर्मितीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली तरीही प्रशासनाकडून शहरातील भुयारी मार्गाचा डीपीआर करण्यास होणारा विलंब हा क्लेश दायी आहे अशी संतप्त भावना आमदार हेमंत रासने यांनी आज जिल्हा नियोजन समिती बैठकित बोलताना व्यक्त करून प्रशासनाच्या दिरंगाई ला चव्हाट्यावर मांडले
त्यांनी असे म्हटले आहे कि,’ आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या जिल्हा नियोजन समिती बैठकीत कसबा मतदारसंघासह शहराच्या विकासाचे अनेक महत्त्वाचे प्रश्न मांडले. स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या अनुपस्थितीत झालेली ही पहिलीच बैठक भावनिक वातावरणात पार पडली. बैठकीच्या सुरुवातीला स्वर्गीय अजितदादांना श्रद्धांजली वाहण्यात आली.कसबा मतदारसंघासह शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी “शनिवारवाडा ते स्वारगेट आणि सारसबाग ते शनिवारवाडा” या दोन महत्त्वाच्या भुयारी मार्गांच्या निर्मितीसाठी माझा सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात ५४ किमी भुयारी मार्ग निर्मितीची घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद असतानाही प्रशासनाकडून भुयारी मार्गांचा डीपीआर तयार करण्यात होणारा विलंब हा नागरिकांच्या हिताचा नाही. त्यामुळे या दोन्ही प्रकल्पांना गती देण्यासाठी तात्काळ डीपीआर तयार करण्याची मागणी यावेळी केली. शहरातील रस्ते आणि फूटपाथवरील अतिक्रमणांमुळे नागरिकांना चालताना देखील अडचण होत असून वाहतूक कोंडीत भर पडत आहे. प्रशासनाकडून मात्र ठोस कारवाई होताना दिसत नाही. कोणत्याही अतिक्रमणांना अभय न देता तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी देखील आजच्या जिल्हा नियोजन समिती बैठकीत केली.पुणेकरांच्या हितासाठी, मध्यवर्ती भागातील वाहतूक प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी माझा पाठपुरावा सुरूच राहणार आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागातील वाढती वाहतूक कोंडी कायमस्वरूपी सोडवण्यासाठी प्रस्तावित “शनिवारवाडा ते स्वारगेट” आणि “सारसबाग ते शनिवारवाडा” या दोन महत्त्वाच्या भुयारी मार्गांचा डीपीआर तातडीने तयार करण्यात यावा, या प्रकल्पांमुळे शहरातील वाहतूक सुरळीत होण्यास मोठी मदत होणार आहे. शहरातील रस्ते आणि फूटपाथवरील अतिक्रमणांमुळे नागरिकांना दररोज त्रास सहन करावा लागत आहे. पादचाऱ्यांची सुरक्षितता आणि वाहतुकीची शिस्त राखण्यासाठी अतिक्रमणे हटवण्याची मोहीम तात्काळ सुरू करावी.शहरातील बहुतांश रस्त्यांवर MSEB चे फिडर पिलर हे फूटपाथच्या मधोमध उभे आहेत. अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा साठून क्रॉनिक स्पॉट तयार होतात. मध्यंतरी पुणे शहरात पिलरचा शॉक लागून एका नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी हे पिलर तातडीने स्थलांतरित करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी केली.

