पुणे-येथील महापालिकेच्या प्रभाग क्र. ३०, कर्वेनगर-हिंगणे होम कॉलनी या ठिकाणी दोन टेनिस कोर्ट विकसित केले असून काल तिसऱ्या टेनिस कोर्टचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. मातोश्री माजी नगरसेविका सौ. लक्ष्मीताई दुधाने यांच्या हस्ते संपन्न झालेल्या या सोहळ्यामुळे नागरिकांतून संतोष व्यक्त होत आहे.
या संदर्भात नगरसेवक स्वप्नील देवराम दुधाने यांनी सांगितले कि,’ आपल्या स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल येथील बास्केट बॉल मैदानाची दुरावस्था झाल्याने अपघात होण्याची संभाव्यता वाढली होती. गेल्या आठ वर्षांपासून अविरतपणे सेवा देणाऱ्या या मैदानाची डागडुजी होणे, काळाची गरज बनले होते. याकरिता आपण चार महिन्यांपूर्वी मनपाकडे पाठपुरावा करत ५० लाख रुपये निधी मंजूर करून घेतला असून टेनिस कोर्टच्या सोबतीने बास्केट बॉल कोर्टच्याही कामाचा शुभारंभ होत आहे.यामुळे येत्या दोन महिन्यात उत्तम दर्जाचे सिंथेटीक टेनिस कोर्ट आणि बास्केट बॉल कोर्ट साकारत असून यामुळे प्रभागातील आणि पर्यायाने शहरातील खेळाडू वर्गाला प्रोत्साहन प्राप्त होईल, यात शंकाच नाही. याप्रसंगी माझे सहकारी, पक्षाचे पदाधिकारी, खेळाडू तसेच अनेक नागरिक यांनी उपस्थिती दर्शवत कामाबद्दल भरभरून कौतुक केले. लवकरच सदर प्रकल्प पूर्णत्वास जात असून असेच अनेक वैविध्यपूर्ण उपक्रम राबवण्याचा आमचा मानस असेल .

