पुणे : अजित पवार असते तर पुण्याच्या विकासाच्या आड कोणी येणार नाही, असा शब्द त्यांनी पुणेकरांना दिला असता, असे मत नगरसेवक अमोल बालवडकर यांनी व्यक्त केले. अजित पवार यांना श्रद्धांजली वाहताना बालवडकर यांनी त्यांच्या कार्यपद्धतीचा आणि पुण्याविषयीच्या जिव्हाळ्याचा उल्लेख केला.पुण्यातील मेट्रो संदर्भात अजित पवार यांनी दाखवलेल्या दृष्टिकोनाचा उल्लेख करत बालवडकर म्हणाले, “मोफत मेट्रोचे स्वप्न अजितदादांनी पुणेकरांना दाखवले होते. तसा प्रयत्न आपण करून दाखवला पाहिजे. अजितदादांनी यासाठी नेमका काय आराखडा तयार केला होता, याचा पाठपुरावा करणे आवश्यक आहे.”बालवडकर म्हणाले, “पुण्याचा जिव्हाळा असणारा नेता हरपला आहे. प्रशासनावर पकड असलेला आणि शहराच्या प्रत्येक विषयाची तंतोतंत माहिती असणारा अजितदादा हा एकमेव नेता होता. कार्यकर्त्यांना बळ देणारा, त्यांना न्याय देणारा आणि दिलेला शब्द पाळणारा असा दुर्मिळ नेता आज आपल्यातून गेला आहे.”
अजित पवार यांची कार्यक्षमतेंचा उल्लेख करत बालवडकर यांनी सांगितले की, ते चोवीस तास काम करूनही वेळ कमी पडत असल्यासारखे वाटत असे. शहरातील वाहतूक कोंडी, कचरा व्यवस्थापन, तसेच नागरी प्रश्नांवर अजित पवार यांचे बारकाईने लक्ष असे. कोणताही विषय असो, त्याला न्याय देण्याचा प्रयत्न अजितदादांकडून होत असे, असेही त्यांनी नमूद केले.अजितदादा अभ्यासू होते आर्थिक विषयावर त्यांचा गाढ अभ्यास होता मोफत प्रवासाच्या संदर्भात बालवडकर यांनी यावेळी एक सूचनाही मांडली. प्रायोगिक तत्त्वावर एक महिन्यासाठी मेट्रो मोफत करून पाहावी. त्यातून प्रदूषण, हवेची गुणवत्ता आणि वाहतूक कोंडीवर नेमका काय परिणाम होतो, याचा अभ्यास करता येईल, असे बालवडकर यांनी सांगितले. शहरातील वाढत्या वाहतूक समस्यांवर आणि प्रदूषणावर उपाय म्हणून सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम करण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
श्रद्धांजली अर्पण करताना बालवडकर यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून शहराच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करणे हीच अजित पवार यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे मत व्यक्त केले. तसेच अजित पवार यांनी पुणेकरांना आणि शहरासाठी दिलेली आश्वासने पूर्ण करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.

