पुणे :महापालिकेत आज सोमवारी महापालिकेच्या सभागृहात महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक पार पडली जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून यावेळी काम पाहिले. भारतीय जनता पक्षाच्या मंजुषा नागपुरे यांची महापौर पदी बिनविरोध निवड तर उपमहापौरपदी परशुराम वाडेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे. तीन सदस्य यांनी पुणे मनपा महापौर पदासाठी अर्ज दाखल केले होते. भारतीय जनता पक्षाकडून मंजुषा नागपुरे, राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाकडून शितल सावंत तर काँग्रेसकडून अश्विनी लांडगे यांनी उमेदवारी अर्ज महापौर पदासाठी दाखल केला होता. त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शीतल अजय सावंत आणि काँग्रेसकडून अश्विनी लांडगे यांनी त्यांची नावे १५ मिनिटांच्या माघारी वेळेत मागे घेतली आहे. भारतीय जनता पक्षाचे गटनेते गणेश बिडकर यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेत्यांशी चर्चा करून संबंधित निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी शिष्टाई केली आणि ती फळाला आली. त्यानंतर मंजुषा नागपुरे यांची महापौरपदी बिनविरोध निवड करण्यात आली. त्यानंतर सभागृहात उपस्थित सदस्यांनी त्यांचे स्वागत केले.
उपमहापौर पदासाठी तीन जणांनी सहा अर्ज दाखल केले होते. त्यापैकी अर्ज माघारी मुदतीत अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. उपमहापौर पदासाठी काँग्रेस पक्षाकडून साहिल केदारी यांनी दोन अर्ज दाखल केले. भाजपकडून परशुराम वाडेकर यांनी देखील तीन अर्ज दाखल केले. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दत्ता बहिरट यांनी अर्ज दाखल केले होते. संबंधित अर्ज माघारी घेण्यासाठी १५ मिनिटांचा वेळ देण्यात आला. त्यामध्ये पुन्हा एकदा भाजप गटनेते गणेश बिडकर यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेत्यांशी चर्चा केली. अखेर उपमहापौरपदी साहिल केदारी आणि दत्ता बहिरट यांनी अर्ज माघारी घेतला. त्यानंतर परशुराम वाडेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी आणि महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी नियुक्तीचे पत्र त्यांना दिले.

