मातृशक्तीचं नेतृत्व मुंबईच्या महानगरपालिकेला लाभलेलं आहे- अमीत साटम
मुंबई-
महायुतीकडून महापौर आणि उपमहापौर पदाच्या उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर भाजपा मुंबई अध्यक्ष आणि आमदार अमीत साटम यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासह महापौरपदाच्या उमेदवार श्रीमती रितू तावडे, भाजपचे कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा, माजी खासदार मनोज कोटक, गटनेते गणेश खणकर, भाजप सरचिटणीस आचार्य पवन त्रिपाठी, श्रीमती श्वेता परुळकर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना अमीत साटम म्हणाले, “४४ वर्षांनंतर भाजपाचा महापौर मुंबईच्या महानगरपालिकेत विराजमान होणार असून येणाऱ्या काळात मुंबई शहराला भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देण्याच्या हेतूने, मुंबई शहराचा विकास आणि प्रगती घडवण्याच्या, तसेच शहराची सुरक्षा अबाधित ठेवण्याच्या दृष्टीकोनातून मुंबईच्या महापौर कार्यरत असतील. महापालिकेला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढणं हे त्यांचं परम कर्तव्य असेल. मुंबईकरांचं जीवन सुकर करणं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिजननुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महापौर आणि उपमहापौर हे कार्य करतील.”
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि मनसे यांच्याकडून उमेदवारीची शक्यता असल्याने याचं आव्हान वाटतं का? या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले, “सर्वांनाच उमेदवारी अर्ज दाखल करण्याचं स्वातंत्र्य असतं. त्यामुळे ज्यांना अर्ज दाखल करायचे आहेत ते सर्वच उमेदवारी अर्ज दाखल करु शकतात पण भाजपा आणि शिवसेना (शिंदे गट) यांचे ११८ नगरसेवक आणि नगरसेविका आहेत आणि त्या ११८ व्यतिरिक्त आणखी काही नगरसेवकांचा पाठिंबा मिळाल्यामुळे महायुतीला स्पष्ट बहुमत प्राप्त झालेलं आहे.” यासोबत एमआयएमच्या नगरसेवकांना सोबत घेऊन जाणार का या प्रश्नाचं उत्तर देताना, “मी अजिबात त्यांचं स्वागत करणार नाही. आमचा त्यांच्याशी कोणताही संबंध नाही. समाजविरोधी, समाजविघातक, देशविरोधी वृत्तींच्या शक्तींशी सहानुभूती ठेवणाऱ्यांशी आम्ही नेहमीच संघर्ष केलेला आहे आणि तो कायम राहील.” असंही त्यांनी स्पष्ट केलं.
ते पुढे म्हणाले, “मुंबईचा महापौर हा हिंदू आणि मराठीच असेल ही सुरुवातीलाच सांगितलेलं होतं. कदाचित विरोधकांना त्यांचा महापौर हा दुसराच कोणीतरी करायचा होता मात्र महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकला असून त्यांचं कटकारस्थान हे मुंबईकरांनी उधळून लावलेलं आहे आणि मुंबईकरांना, हिंदू, मराठी, कोकणी आणि मालवणी महापौर लाभलेला आहे. मातृशक्तीचं नेतृत्व मुंबईच्या महानगरपालिकेला लाभलेलं आहे. ज्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली मुंबई शहर भ्रष्टाचारमुक्त करून शहराचा विकास करायचा आहे. त्या सर्व हिंदूत्ववादी शक्तींचं आम्ही स्वागत करतो.”
महायुतीकडून महापौर पदासाठी रितू तावडे तर उपमहापौर पदासाठी संजय घाडी यांना उमेदवारी

मुंबई महानगरपालिकेचे महापौरपद खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवरासाठी राखीव असल्याचे जाहीर झाल्यानंतर महापौर कोण होणार याची बरीच उत्सुकता होती. भारतीय जनता पक्षाने श्रीमती रितू तावडे यांच्या नावाची घोषणा महापौर पदाच्या उमेदवारीसाठी करत या प्रश्नाला पूर्ण विराम दिला आहे. तर शिवसेनेकडून श्री. संजय घाडी यांचे नाव उपमहापौर पदाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले आहे. महापौर आणि उपमहापौर पदाच्या उमेदवारीसाठीच्या नावांची घोषणा महायुतीच्या वतीने भाजपा मुंबई अध्यक्ष आणि आमदार मान. श्री अमीत साटम यांनी केली. यावेळी भाजपचे कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा, माजी खासदार मनोज कोटक, भाजप गटनेते श्री. गणेश खणकर, सरचिटणीस आचार्य पवन त्रिपाठी, श्रीमती श्वेता परुळकर, ज्येष्ठ नगरसेवक श्री. प्रभाकर शिंदे, शिवसेनेचे सरचिटणीस राहुल शेवाळे, शिवसेना गटनेते अमेय घोले, शिवसेनाच्या शीतल म्हात्रे, नवनिर्वाचित नगरसेवक तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
महापौरपदासाठी अर्ज भरण्याचा काल शेवटचा दिवस होता. येत्या ११ फेब्रुवारी रोजी महापौर पदासाठी निवडणूक होणार असून त्यासाठी शेवटच्या टप्प्यात भाजपकडून रितू तावडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. रितू तावडे या घाटकोपर येथील प्रभाग क्रमांक १३२ मधून नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. याशिवाय त्यांनी याआधी मुंबई महापालिकेच्या शिक्षण समितीचे अध्यक्षपदही भूषविले आहे. भाजपा हा सध्या महापालिकेतील सर्वात मोठा पक्ष असून रितू तावडे या महापालिकेच्या कामकाजाचा अनुभव असलेल्या तसेच संघटनात्मक दृष्टीकोनातून मजबूत अशा उमेदवार म्हणून ओळखल्या जातात.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रितू तावडे म्हणाल्या, “महापौर नाही तर मी मुंबईची सेवक म्हणून काम करणार आहे. भारतीय जनता पक्ष हा शिस्तबद्ध पक्ष आहे. त्यामुळे वरिष्ठ जो निर्णय देतात तो सर्व कार्यकर्त्यांना मान्य असतो. माझ्यासाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. त्यासाठी मी आभारी आहे.”
तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेकडून प्रभाग क्रमांक ५ चे नगरसेवक संजय घाडी यांना उपमहापौर पदाची उमेदावारी जाहीर करण्यात आली आहे आणि हे उपमहापौरपद पुढील सव्वा वर्षासाठी असणार असल्याचेही शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान महापौर आणि उपमहापौर पदाची अधिकृत उमेदवारी जाहीर झाली असली तरी संख्याबळाचा विचार करता आगामी काळात ही निवडणूक बिनविरोध होऊन महायुतीच्या उमेदवरांचा विजय निश्चित मानला जात आहे.

