मुंबई-खासदार संजय राऊत यांनी मुंबईच्या महापौर पदाच्या उमेदवार रितू तावडे यांच्या विधानाचा समाचार घेताना केंद्र सरकार आणि भाजपच्या दुटप्पी भूमिकेवर घणाघाती टीका केली आहे. बांगलादेशातील हिंदूंच्या स्थितीवरून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “ज्या बांगलादेशात हिंदूंची मंदिरे पाडली जात आहेत आणि हिंदूंच्या कतली होत आहेत, त्याच बांगलादेशला मोदी सरकार अर्थसंकल्पातून कोट्यवधींची मदत का देत आहे?” असा जळजळीत सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे.
मुंबईला बांगलादेशीमुक्त करण्याच्या रितू तावडे यांच्या विधानावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, “महापौरांनी आधी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली पाहिजे. बांगलादेशात गेल्या काही काळात हिंदूंची ४५० मंदिरे पाडली गेली, हजारो हिंदूंची घरे जाळली गेली आणि सुमारे २३० ते २४० हिंदूंची हत्या झाली. यावर देशाचे पंतप्रधान किंवा गृहमंत्री एक अक्षरही बोलायला तयार नाहीत. उलट, भारताच्या अर्थसंकल्पात हिंदूंच्या मारेकऱ्यांना काही कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. हा पैसा हिंदूंच्या हत्येसाठी दिला आहे का? हे महापौरांनी मोदींना विचारावे.”
मुंबईच्या महापौरांना प्रशासकीय अधिकार नसतात, त्यांनी शहराच्या विकासावर बोलले पाहिजे, असे सांगत राऊत म्हणाले, “जर महापौर पुन्हा हिंदू-मुस्लिम हाच मुद्दा घेऊन बसणार असतील, तर काल संघाच्या व्यासपीठावर सलमान खानला बोलावून काहीच उपयोग झाला नाही असे म्हणावे लागेल. घुसखोर बांगलादेशींना हाकलायची आमचीही भूमिका आहे, पण त्याचे राजकारण करू नका.”
रितू तावडे यांच्या निवडीवर बोलताना राऊतांनी भाजपवर खोचक टीका केली. “मुंबईच्या महापौरपदी भाजपच्या नगरसेविका रितू तावडे यांची निवड केलेली आहे. या निवडीचे मी स्वागत करतो. भाजपला या निमित्ताने कळले की, मुंबईतला मराठी माणूस हा सुद्धा हिंदू आहे आणि या मराठी माणसानेच देशाच्या स्वातंत्र्याचे आणि हिंदुत्वाचे रक्षण केलेले आहे. शिवसेनेने जो निवडणुकीत प्रचाराची दिशा ठरवली. मराठी माणूस, मराठी अस्मित आणि मराठी जनतेला आम्हाला भरभरून मतदान केले. त्या दबावापोटीच भाजपला मराठी महापौर करावा लागला, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. रितू तावडे या मुळच्या काँग्रेसच्या आहेत. भाजपकडे स्वत:चे ओरिजिनल असे काही नाही,” असा टोलाही राऊत यांनी भाजपला लगावला.
काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यक्रम झाला. मी पाहत होतो. मलाही आमंत्रण होते, पण मला दुसऱ्या कार्यक्रमाला जायचे असल्याने मी तिथे गेलो नाही. व्यासपीठावर सलमान खान होते, असे मला कळले. हे सलमान खानचे स्वागत गर्दी जमवायला होते की, संघात यापुढे मुस्लिमांनाही खुले आमंत्रण आहे? हे मोहन भागवतांनी स्पष्ट केले असते, तर योग्य झाले असते.
संजय राऊत म्हणाले, ज्या पद्धतीने हिंदू-मुस्लीम असा द्वेष आणि सूडपूर्ण असा प्रसार गेल्या काही काळापासून केला जात आहे. त्यामध्ये संघही सामील आहे. कारण मोदी, फडणवीस, अमित शहा किंवा इतर सगळे लो जे हिंदू-मुस्लीम यांचे द्वेषपूर्ण राजकारण करत आहेत, ते सगळे मूळचे संघाचेच लोक आहेत. त्यामुळे सलमान खान आमच्या व्यासपीठावर आला हे लोकांना दाखवायला होते का? उद्या सत्ता गेल्यावर हे सगळे लोक तुमच्या व्यासपीठावर येतील का? हा गमतीचा प्रश्न आहे. सलमान खान याला बोलावले याचे स्वागत, पण या देशात मोठ्या प्रमाणावर राष्ट्रभक्त, राष्ट्रवादी मुसलमान आहेत. त्यांचेही स्वागत करा, असेही ते म्हणाले.

