पुणे —
सामाजिक स्वच्छतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलणाऱ्या रेडिओ मिर्चीच्या “मिर्ची वेस्ट-हर्ता” या उपक्रमाला आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली असून या उपक्रमाची अधिकृत नोंद आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये करण्यात आली आहे. या ऐतिहासिक यशाच्या निमित्ताने पुण्यात गुरुवारी भव्य गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. एमसीसीआयए ट्रेड टॉवर येथील सुमंत मुळगांवकर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात उपक्रमाचा संपूर्ण प्रवास, यशोगाथा मांडण्यात आली तसेच सहभागी व्यक्ती व संस्थांचा सत्कार करण्यात आला.
या सोहळ्यास कोहिनूर ग्रुपचे एमडी व चेअरमन कृष्णकुमार गोयल, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम, पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले, रेडिओ मिर्चीचे बिझनेस संचालक जयेश पाटील तसेच कंटेंट लीडर स्मिता रणदिवे (त्रिभुवन) यांची प्रमुख उपस्थिती होती.
मनपा आयुक्त नवल किशोर राम यांनी रेडिओ मिर्चीचे अभिनंदन करताना सांगितले की, “मिर्ची वेस्ट-हर्ता हा उपक्रम केवळ नाविन्यपूर्ण नसून समाजासाठी प्रेरणादायी आहे. विघ्नहर्ता ही संकल्पना गणेशोत्सवापुरती मर्यादित न ठेवता स्वच्छतेसाठी वापरणे ही कौतुकास्पद बाब आहे. कचरा व्यवस्थापन, प्रदूषण, पाणी शुद्धीकरण ही आजची मोठी आव्हाने असून प्रशासनासोबत नागरिकांनीही जबाबदारीने सहभाग घ्यायला हवा. पुणे हे शहर युरोपमधील शहरांपेक्षाही अधिक सुंदर बनू शकते, त्यासाठी रेडिओ मिर्चीसारख्या माध्यमांची भूमिका महत्त्वाची आहे.”
कृष्णकुमार गोयल म्हणाले, “रेडिओ मिर्चीने पुणेकरांशी एक भावनिक नातं निर्माण केलं आहे. वाहतूक कोंडीत, दैनंदिन धावपळीत रेडिओ मिर्ची हा प्रत्येकाचा सोबती आहे. ‘मिर्ची वेस्ट-हर्ता’द्वारे स्वच्छतेचा संदेश प्रभावीपणे पोहोचवण्यात आला. पुण्यात दररोज निर्माण होणाऱ्या सुमारे १५ मेट्रिक टन कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी असे उपक्रम अत्यंत आवश्यक आहेत.”
रेडिओ मिर्चीचे बिझनेस संचालक जयेश पाटील यांनी सांगितले की, हा उपक्रम कचरा व्यवस्थापन, पुनर्वापर आणि पर्यावरण जनजागृतीसाठी राबवण्यात आला होता. क्यूआर कोडच्या माध्यमातून नागरिकांना सहभागी करून घेत तब्बल ९ हजारांहून अधिक नागरिकांनी सामाजिक स्वच्छतेची शपथ घेतली. “हा उपक्रम केवळ मोहीम नसून समाजाला सकारात्मक दिशा देणारा प्रयत्न आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
रेडिओ मिर्चीने या उपक्रमातून सामाजिक जबाबदारीची ठोस जाणीव पुन्हा एकदा करून दिली असून, स्वच्छ व सुंदर शहरासाठीचा हा प्रवास भविष्यात अधिक व्यापक होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
मिर्चीच्या ‘वेस्ट-हर्ता’ उपक्रमाची आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद,पुण्यात भव्य गौरव सोहळा संपन्न
Date:

