पुणे: भारतीय संस्कृतीचा वारसा जतन करण्याच्या उद्देशाने पुणे महानगरपालिका आणि एमआयटी एडीटी (MIT ADT) विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘हेरिटेज यात्रा २०२६’ या महोत्सवाचे आज, ४ फेब्रुवारी रोजी उत्साहात उद्घाटन झाले. सिंहगड रस्ता येथील पु. ल. देशपांडे कलाग्राम येथे ७ फेब्रुवारीपर्यंत हा उपक्रम सुरू राहणार आहे.
या सोहळ्याचे उद्घाटन प्रसिद्ध संगीततज्ज्ञ श्री. आदिनाथजी मंगेशकर यांच्या हस्ते झाले. यावेळी फिल्म्स डिव्हिजनचे माजी महासंचालक श्री. मुकेश शर्मा, पुणे महानगरपालिकेच्या सांस्कृतिक विभागाचे प्रशासकीय अधिकारी श्री. राजेश कामठे, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजेश एस., कार्यकारी संचालक श्रीमती ज्योती ढाकणे, प्र-कुलगुरू डॉ. नचिकेत ठाकूर आणि महोत्सवाच्या निमंत्रक डॉ. अश्विनी पेठे उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी बोलताना श्री. आदिनाथ मंगेशकर म्हणाले की, “पुणे महानगरपालिका आणि एमआयटी एडीटी विद्यापीठाचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. पारंपारिक हस्तकलेपासून ते ऑगमेंटेड रिअॅलिटी (AR) सारख्या आधुनिक तंत्रज्ञानापर्यंतचा प्रवास या महोत्सवात अनुभवता येतो. आपण एका समृद्ध भारतीय संस्कृतीचे भाग आहोत, ही भाग्याची गोष्ट असून तिचे पुनरुज्जीवन करणे आवश्यक आहे.” त्यांनी तरुण पिढीला ज्ञानाची भूक जोपासण्याचे आवाहन केले.
एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजेश एस. यांनी भविष्यातील आव्हानांना सामोरे जाताना आपला वारसा आणि संस्कृती यांना सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज व्यक्त केली. ते म्हणाले की, आपण आपल्या वैदिक संस्कृतीच्या मुळांकडे पुन्हा वळणे आणि तरुण पिढीमध्ये जिज्ञासू वृत्ती विकसित करणे ही काळाची गरज आहे. भविष्याकडे झेप घेताना आपल्या संस्कृतीचा पाया भक्कम असणे अत्यंत आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
पुणे महानगरपालिकेच्या सांस्कृतिक विभागाचे प्रशासकीय अधिकारी श्री. राजेश कामठे यांनी एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या या पुढाकाराचे आणि पुणे महानगरपालिकेसोबतच्या या सहकार्याचे विशेष कौतुक केले. ‘हेरिटेज यात्रा’ हा उपक्रम आगामी काळात अधिक व्यापक आणि भव्य होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. सांस्कृतिक वारसा लाभलेले शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांना पुणे महानगरपालिका आणि येथील कलाग्राम केंद्र नेहमीच पूर्ण पाठबळ देईल, अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.
एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या कार्यकारी संचालक श्रीमती ज्योती ढाकणे यांनी कला ही भारतीयांची जीवनपद्धती असल्याचे सांगत, जागतिकीकरणाच्या युगातही परंपरा न विसरण्याचे आवाहन केले. तसेच, विद्यार्थ्यांनी कला क्षेत्राकडे करिअर म्हणून पाहावे आणि आपल्या कौशल्याचा उपयोग देशाच्या प्रगतीसाठी करावा, असेही त्यांनी नमूद केले.
उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी पारंपारिक विटांची भिंत तयार करणे, आभासी ऐतिहासिक सफर (Immersive Heritage), मातीकाम (Pottery), नाट्य कार्यशाळा, गोंड पेंटिंग, श्लोक पठण, वारली चित्रकला आणि सामुदायिक विणकाम यांसारख्या उपक्रमांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला.
या महोत्सवाचे आकर्षण असलेल्या ‘हेरिटेज प्लेलँड’ मध्ये विद्यार्थ्यांनी आज खेळांच्या माध्यमातून इतिहासाची सफर केली. शैक्षणिक तज्ज्ञांनी तयार केलेल्या या खेळांमध्ये विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने सहभाग घेतला. यामध्ये प्रामुख्याने ‘महामिस्टरी’ (Mahamystery), ‘डार्ट अँड डिस्कव्हर’ (Dart and Discover), ‘अराउंड इंडिया’ (Around India) आणि ‘मिस्टरी बॉक्स पझल’ (Mystery box puzzle) यांसारख्या खेळांनी विद्यार्थ्यांची मने जिंकली. विशेषतः ‘महाराष्ट्रासाठी स्वतःच्या चलनाची रचना करणे’ (Creating currency design for Maharashtra) या उपक्रमात विद्यार्थ्यांनी आपली सर्जनशीलता दाखवत महाराष्ट्राच्या अस्मितेचे दर्शन घडवणारी चलने रेखाटली.
महोत्सवाचा भाग म्हणून ६ आणि ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ८:०० वाजता शनिवारवाड्यापासून ‘हेरिटेज वॉक’ आयोजित करण्यात आला आहे. ७ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या विनामूल्य उपक्रमात पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.

