मुंबई, ४ फेब्रुवारी २०२६ : आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर माणूस नेमकं काय निवडतो? वेदना की सन्मान? नातेसंबंध की स्वतःचा निर्णय घेण्याचा हक्क? या सगळ्या प्रश्नांचा अतिशय संवेदनशील आणि हृदयाला भिडणारा वेध घेणारा मराठी चित्रपट ‘आता वेळ झाली’ येत्या ६ फेब्रुवारी रोजी अल्ट्रा झकास ओटीटीवर प्रीमियरसाठी तयार आहे.
मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि रोहिणी हट्टंगडी यांच्या सशक्त अभिनयाने नटलेला हा चित्रपट अनंत महादेवन यांनी दिग्दर्शित व सह-लिखित केला आहे. चित्रपटाची निर्मिती दिनेश बन्सल, जी. के. अग्रवाल तसेच अनंत महादेवन यांनी केली असून, वास्तविक घटनांपासून प्रेरणा घेत हा चित्रपट इच्छामरणासारख्या अत्यंत नाजूक विषयाकडे करुणा, संयम आणि मानवी संवेदनशीलतेच्या दृष्टिकोनातून पाहतो.
‘आता वेळ झाली’ ही एका वृद्ध दाम्पत्याची कथा आहे. जिथे वाढतं वय, आजारपण, एकमेकांवरील प्रेम आणि आयुष्याचा शेवट सन्मानाने निवडण्याचा प्रश्न समोर येतो. कोणताही दिखावा न करता, सूक्ष्म आणि परिणामकारक मांडणीतून हा सिनेमा प्रेक्षकांना अंतर्मुख करतो आणि चर्चेचा विषय बनतो.
या चित्रपटात दिलीप प्रभावळकर यांचा संयमी आणि परिणामकारक अभिनय, तसेच रोहिणी हट्टंगडी यांच्यासोबतची भावनिक केमिस्ट्री, कथेला हृदयस्पर्शी बनवते. तसेच भरत दाभोळकर, सुरेश विश्वकर्मा, स्मिता तांबे, जयंत वाडकर आणि अभिनव पाटकर यांसारख्या अनुभवी कलाकारांनीही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. ‘आता वेळ झाली’ या चित्रपटाला डॅलस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, राजस्थान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि जागरण चित्रपट महोत्सव अशा अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर प्रशंसा मिळाली आहे.
चित्रपटाच्या प्रीमियरबद्ल बोलताना, अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लि. चे सी.ई.ओ. श्री. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले, “मराठी चित्रपटसृष्टीने नेहमीच समाजाला विचार करायला लावणाऱ्या कथा मांडल्या आहेत. अशा अर्थपूर्ण चित्रपटांना अल्ट्रा झकास मराठी OTTवरून जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवताना आम्हाला खरंच अभिमान वाटतो.”
अल्ट्रा झकास मराठी OTT हे भारतातील सर्वात मोठे मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म असून, २०००हून अधिक मराठी चित्रपट, वेब सिरीज, नाटकं आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची समृद्ध लायब्ररी येथे उपलब्ध आहे. महाराष्ट्रासह जगभरातील मराठी प्रेक्षकांसाठी अस्सल मराठमोळ मनोरंजन पोहोचवण्याचा अल्ट्रा झकासचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो आणि कायम राहील.
शिवाय अल्ट्रा झकास प्लॅटफॉर्म Android, iOS, टॅब, वेब, Android TV, Fire TV, Jio Store आणि Cloud TV वर सहज उपलब्ध आहे. त्यामुळे प्रेक्षकांना याचा आनंद कधीही, कुठेही घेता येईल.

