ऑटो घटक उत्पादक धूत ट्रान्समिशन यांनी संभाव्य प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) च्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकत, गोपनीय प्री-फायलिंग मार्गाद्वारे भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) कडे ड्राफ्ट कागदपत्रे सादर केली आहेत अशी माहिती कंपनीने जारी केलेल्या सार्वजनिक फायलिंग जाहिरातीतून देण्यात आली आहे.
दोन दशकांहून अधिक काळापूर्वी प्रवर्तक राहुल धूत यांनी स्थापन केलेली ही कंपनी ऑटोमोटिव्ह आणि ग्राहकोपयोगी टिकाऊ वस्तू क्षेत्रातील मूळ उपकरण उत्पादकांसाठीची (Original Equipment Manufacturers – OEMs) प्रमुख पुरवठादार आहे. कंपनी वायरिंग हार्नेस, ऑटोमोटिव्ह स्विचेस, इलेक्ट्रॉनिक सेन्सर्स आणि कंट्रोलर्स, कनेक्टर्स आणि टर्मिनल्स, ऑटोमोटिव्ह केबल्स, पॉवर कॉर्ड्स आणि बॅटरी पॅक्सचे उत्पादन करते. तिची उत्पादने दुचाकी, तीनचाकी, प्रवासी व व्यावसायिक वाहने, ऑफ-रोड वाहने, अर्थ मूव्हर्स, कृषी उपकरणे, वैद्यकीय उपकरणे आणि घरगुती उपकरणे अशा विविध वापरांसाठी वापरली जातात.
गेल्या काही वर्षांमध्ये कंपनीने जागतिक स्तरावर आपला ठसा उमटविला असून कंपनीचे ग्राहक आठ देशांमध्ये आणि तीन खंडांमध्ये पसरलेले आहेत. आंतरराष्ट्रीय विस्ताराचा भाग म्हणून, धूत ट्रान्समिशनने 2012 मध्ये यूकेमध्ये अभियांत्रिकी आणि विपणन कार्यालय स्थापन केले. 2017 मध्ये स्लोव्हाकियामध्ये उत्पादन सुविधा केंद्रासह स्कॉटलंडमधील TFC केबल्सचे अधिग्रहण करण्यात आले. त्यानंतर 2018 मध्ये यूकेमधील पार्किन्सन हार्नेस आणि 2019 मध्ये सॅन इलेक्ट्रोमेक या कंपन्यांचे अधिग्रहण करण्यात आले.
धूत ट्रान्समिशन एकात्मिक उत्पादन आणि तंत्रज्ञान प्लॅटफॉर्मवर कार्यरत असून कंपनीची सर्व उत्पादन सुविधा केंद्रे आणि कार्यालये SAP S/4HANA प्रणालीद्वारे जोडलेली आहेत. कंपनीत 12,000 हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत आणि ISO 9001, IATF 16949, ISO 14001 आणि ISO 45001 यांसह अनेक जागतिक दर्जाची गुणवत्ता आणि सुरक्षितता प्रमाणपत्रे कंपनीकडे आहेत.
क्रिसिल रेटिंग्स मे 2025 च्या रेटिंग अहवालानुसार कंपनीने ऑटोमोटिव्ह वायर हार्नेस आणि केबल्स विभागात मजबूत बाजारपेठीय स्थान निर्माण केले आहे. हे स्थान प्रवर्तकांच्या दोन दशकांहून अधिक अनुभवावर तसेच उत्पादन विकास आणि क्षमता विस्तारातील सातत्यपूर्ण गुंतवणुकीवर आधारित आहे. अहवालात नमूद करण्यात आले आहे की धूत ट्रान्समिशन ही या विभागातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असून, ती सर्व प्रमुख ऑटोमोटिव्ह OEMs ना पुरवठा करते. बजाज ऑटो, टीव्हीएस मोटर कंपनी, होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया आणि रॉयल एनफिल्ड हे तिचे प्रमुख ग्राहक आहेत
कंपनीचे एकत्रित उत्पन्न आर्थिक वर्ष 22 मधील 1,550 कोटी रु. वरून आर्थिक वर्ष 24 मध्ये 2,653 कोटी रु. पर्यंत वाढले असून उत्पादन आणि भौगोलिक विस्तारामुळे झालेल्या सातत्यपूर्ण वाढीचे हे द्योतक आहे. कंपनीच्या एकूण उत्पन्नापैकी 15–20% हिस्सा सातत्याने परदेशी व्यवहारांमधून येतो. त्यातून भौगोलिक वैविध्यपूर्णता यांसह व्यवसायाच्या जोखीम प्रोफाइललाही पाठबळ मिळते.
अहवालात सुयोग्य अशा खेळत्या भांडवल व्यवस्थापनाचाही उल्लेख करण्यात आला असून, 31 मार्च 2024 रोजी एकूण चालू मालमत्ता सुमारे 104 दिवसांची होती. यामध्ये 56 दिवसांचे रिसीव्हेबल्स आणि 39 दिवसांचा साठा यांचा समावेश आहे. साठा प्रामुख्याने ऑर्डर-आधारित असून, पतधोरण मध्यम स्वरूपाचे आहे. त्यायोगे मध्यम कालावधीत प्रभावी रोख प्रवाह व्यवस्थापनास मदत होते.
आर्थिक आघाडीवर, कंपनीचा जोखीम प्रोफाइल आश्वस्त करणारा असून 31 मार्च 2024 रोजी निव्वळ संपत्ती 598 कोटी रु. वर पोहोचली आहे. ती मागील वर्षी 387 कोटी रु. होती. यात 0.59 पट वाढ आहे. आर्थिक वर्ष 24 मध्ये डेब्ट संरक्षण मेट्रीक्स अधिक मजबूत झाले असून व्याज कव्हरेज 9.3 पट पर्यंत वाढले आहे.
इक्विटी कंपनी बेन कॅपिटल कडे कंपनीतील 49% हिस्सा आहे. बेन कॅपिटलच्या गुंतवणुकीसोबतच, धूत होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड यांसह प्रवर्तकांच्या मालकीचे घटक धूत ट्रान्समिशनमध्ये सामावून घेण्यात आले आहेत.
ऑटो घटक क्षेत्रातून भांडवली बाजारात सक्रिय सहभाग दिसून येत असताना धूत ट्रान्समिशनचे फायलिंग होत आहे. गेल्या तीन वर्षांत ASK ऑटोमोटिव्ह आणि मदरसन सुमी वायरिंग इंडिया यांसारख्या कंपन्या शेअर बाजारात लिस्ट झाल्या आहेत. तर इतर अनेक ऑटो पूरक आणि EV-संबंधित घटक उत्पादक विविध टप्प्यांवर नियामक फायलिंग प्रक्रियेत आहेत. यामागे स्थानिकीकरण, विद्युतीकरण आणि निर्यात-आधारित वाढीच्या संकल्पनांबाबत गुंतवणूकदारांची सततची रुची दिसून येते.
धूत ट्रान्समिशनचा आयपीओ उत्पादन-केंद्रित सूचीबद्ध कंपन्यांच्या वाढत्या यादीत भर घालणार असून, भारताच्या विस्तारत चाललेल्या ऑटोमोटिव्ह पुरवठा साखळी आणि जागतिक सोर्सिंग संधींचा लाभ घेण्याकडे गुंतवणूकदारांचा कल अधिक बळकट करेल.

