पुणे :भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आज पुणे जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली.
घरोघरी जाऊन प्रचार करा, छोट्या बैठका व मेळाव्यांवर भर द्या, स्थानिक पातळीवर प्रचार करा, असे स्पष्ट निर्देश चव्हाण यांनी दिले.
प्रदेश स्तरावरील कोणताही मंत्री किंवा पदाधिकारी प्रचारासाठी येणार नाही. स्थानिक कार्यकर्त्यांनीच प्रचाराची धुरा सांभाळावी, असेही त्यांनी नमूद केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमांतून झालेली विविध विकासकामे आणि शासकीय योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा, असे आवाहन चव्हाण यांनी केले.
भाजपची बूथ यंत्रणा सक्षम असून, त्या माध्यमातून प्रचार यंत्रणा अधिक प्रभावीपणे राबवावी असे निर्देश चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले.
संघटनात्मक ताकद, कार्यकर्त्यांची मेहनत आणि विकासाच्या मुद्द्यांवर आधारित प्रचार यामुळे पक्षाला मोठे यश मिळेल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.
प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, आमदार राहुल कुल, भीमराव तापकीर, पुणे दक्षिण जिल्हाध्यक्ष शेखर वढणे, पुणे उत्तर जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद, माजी आमदार संजय जगताप आणि संग्राम थोपटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
राजेश पांडे यांनी सूत्रसंचालन केले.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना बैठकीत श्रद्धांजली वाहण्यात आली.

