हवेली, पुणे : हवेली जिल्हा परिषद व पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या गट व गणांच्या मतदार यादी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून अंतिम मतदार यादी तयार करण्याचे काम यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे. हवेली येथील मतदार यादी वर्किंग कॉपी कक्षामध्ये अधिकारी व कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहून ही प्रक्रिया पार पाडण्यात आली. निवडणूक प्रक्रियेत कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी प्रशासनाकडून काटेकोर नियोजन व विशेष दक्षता घेण्यात आली आहे.
सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याशी समन्वय साधून अंतिम मतदार यादीची छपाई प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे उमेदवार व प्रतिनिधींना अंतिम मतदार यादी वेळेत उपलब्ध करून देण्यावर प्रशासनाचा विशेष भर राहिला असून, त्यामुळे निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता व विश्वासार्हता अधिक बळकट होणार आहे.
मतदार यादीची वर्किंग व मार्क कॉपी तयार करताना आवश्यक माहितीचे सखोल संकलन व पडताळणी करण्यात आली. नोंदणीकृत मतदारांची नावे, पत्ते तसेच इतर तपशीलांची अचूकता तपासण्यात आली असून मृत, स्थलांतरित तसेच दुहेरी नोंदी असलेल्या मतदारांची छाननी करून यादी त्रुटीमुक्त करण्यात आली आहे. भारत निवडणूक आयोगाने वेळोवेळी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करत प्रत्येक टप्प्यावर आवश्यक कार्यवाही करण्यात आली.
निवडणूक प्रक्रियेत कोणताही गोंधळ अथवा त्रुटी निर्माण होऊ नयेत, यासाठी प्रशासनाने प्रत्येक बाबीची बारकाईने तपासणी केली आहे. मतदारांना योग्य व वेळेवर सेवा मिळावी तसेच निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण, पारदर्शक आणि सुरळीत पार पडावी, हा प्रशासनाचा मुख्य उद्देश असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने, तहसीलदार अर्चना निकम व तृप्ती कोलते तसेच नोडल अधिकारी रोहन भोसले, प्रा. सचिन शेळके आणि अविनाश तोरणे यांनी माहिती दिली की, संपूर्ण मतदार यादी प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पारदर्शक व सुव्यवस्थित पद्धतीने राबविण्यात आली असून अंतिम मतदार यादी लवकरच सर्व संबंधितांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
जिल्हा परिषद–पंचायत समिती मतदार यादी वर्किंग कॉपीच्या कामास वेग; अंतिम मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण
Date:

