पुणे-उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार याच पक्षाध्यक्ष हव्यात अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे केली आहे.
या संदर्भात त्यांनी या दोन्ही नेत्यांना दिलेल्या पत्रकात म्हटले आहे कि,’राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आधारस्तंभअजितदादा पवार यांच्या निधनाने पक्षावर मोठे दुःखद सावट आले आहे. या कठीण काळात पक्षाला सशक्त, संयमी आणि सर्वांना एकत्र ठेवणारे नेतृत्व अत्यंत आवश्यक आहे. सुनेत्रा अजित पवार वहिनी यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारून पक्षासाठी आणि महाराष्ट्रासाठी आपली बांधिलकी सिद्ध केली आहे. त्यांचा अनुभव, पक्षाशी असलेली निष्ठा आणि कार्यकर्त्यांप्रती असलेली आपुलकी पाहता, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी त्या सर्वार्थाने योग्य आहेत,असा आमचा म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व सेलच्या प्रदेश अध्यक्षांचा ठाम विश्वास आहे..म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विविध सेलचे अध्यक्ष व पदाधिकारी, एकमुखाने सुनेत्रा अजित पवार वहिनी यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात यावी, अशी नम्र पण ठाम मागणी करीत आहोत.आपण या मागणीचा सकारात्मक विचार कराल, ही अपेक्षा.

